पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये सकाळी 11 वाजता वेदांत अग्रवालचं ब्लड सॅम्पल घेतलं. त्याचवेळी आरोपी वेदांतचे वडील विशाल अग्रवालने ससूनच्या डॉ. अजय तावरेंशी संपर्क साधला. डॉ. अजय तावरेंच्या सांगण्यावरुन डॉ. श्रीहरी हळनोरनं ब्लड सॅम्पल बदलून दुसऱ्याच व्यक्तीचं सॅम्पल फॉरेन्सिक लॅबला पाठवलं. त्यानुसार आरोपी वेदांतनं मद्यप्राशन केलं नसल्याचा रिपोर्ट ससूनच्या डॉक्टरांनी दिला. पण पोलिसांनी दुसऱ्या सरकारी रुग्णालयात डीएनए चाचणीसाठी अल्पवयीन आरोपीचे दुसरे ब्लड सॅम्पल घेतलं होतं. ससून मधील ब्लड सॅम्पल वेदांतच्या वडिलांच्या ब्लड सॅम्पलशी मॅच झालं नाही पण दुसऱ्यांदा घेतलेलं सॅम्पल मॅच झालं आणि इथंच ब्लड सॅम्पलमधली हेराफेरी पोलिसांनी पकडली.
अपघाताच्या दिवशी आणि वेदांतचे ब्लॅड सॅम्पल घेतले त्या दिवशी रविवार असल्यानं, फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरेंनी फोनवरुन डॉ. हळनोरला ब्लॅड सॅम्पल बदलण्याच्या सूचना दिल्या. त्यासाठी डॉ. श्रीहरी हळनोरनं 3 लाख रुपयांची लाच घेवून ब्लड सॅम्पल बदलल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. ससूनच्या डॉ. तावरेंना अटक होताच, पुन्हा अजित पवार गटाचे आमदार सुनिल टिंगरेंचं पत्रही पुढं आलंय.
सुनिल टिंगरेंच्याच पत्रानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रिफांनी डॉ. अजय तावरेंकडे ससूनच वैद्यकीय अधीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार दिला. मात्र गेल्याच महिन्यात उंदीर चावून एका रुग्णाच्या मृत्यू प्रकरणात तावरेंनी अधीक्षक पदावरुन उचलबांगडी झाली. पण त्याआधी टिंगरेंच्या पत्रावर, डॉ.तावरेंची वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती करताना, मंत्री मुश्रिफांनी शेरा लिहिताना म्हटलंय की, विनंतीप्रमाणं अतिरिक्त कार्यभार देण्यात यावा. नियमाप्रमाणं प्रोफेसर असण्याची आवश्यकता आहे असे समजते. सध्या ज्यांच्याकडे कार्यभार आहे ते निकष पूर्ण करत नाहीत.
अपघातानंतरही आमदार सुनिल टिंगरेंना आरोपीच्या वडील विशाल अग्रवालांनी फोन केला होता. त्यानंतर टिंगरे येरवडा पोलीस स्टेशनमध्येही आले होते. विरोधकांनी त्यांच्यावर पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोपही केला. आता नियुक्तीसंदर्भात पत्र समोर आल्यानंतर, धंगेकरांनी मंत्री मुश्रिफांचा राजीनामा मागितलाय. इकडे अंजली दमानियांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांकडे बोट दाखवलंय…अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता का ?, आणि फोन केला असेल तर अजित पवारांचा राजीनामा घ्या, अशी मागणी दमानियांनी मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांकडे केलीय. एका रईस बापाच्या पोराला वाचवण्यासाठी, पैसा फेको तमाशा देखो प्रमाणं, प्रशासन बिल्डर विशाल अग्रवालसमोरच सरेंडर झालं होतं. आता एक, एक सत्य समोर येतंय.