पुणे : मनसेच्या (Pune MNS) अडचणी काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत, असेच दिसत आहे. आता आणखी एक मनसेच्या बाबतीतील घडामोड समोर आली आहे. उद्या पुण्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा आहे आणि उद्याच मनसेचे 20 पदाधिकारी शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या उपस्थितीत शिवसेना शहर कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. जवळपास 20 पदाधिकारी मनसेतून शिवसेनेत येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष संजय मोरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे काम पाहून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे सभेच्या दिवशीच मनसेला शिवसेनेने दणका दिल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर मागील अनेक दिवसांपासून पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे पक्षातील मुस्लीम पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले. एवढेच नाही, तर शहराध्यक्ष असलेल्या वसंत मोरेंनीही वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे मनसेत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सध्या त्यातील वीस पदाधिकारी तरी मनसेला सोडत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पुणे मनसेतील या गटबाजीवर राज ठाकरे मात्र अद्याप काही बोललेले नाहीत. उद्याच्या सभेत ते काय बोलतील याविषयीची उत्सुकता आहे.
वसंत मोरे यांचे समर्थक आणि मनसे नेते निलेश माझिरे यांनीही नुकताच पक्षातील सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. निलेश माझिरे मनसेतून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ते पुण्यातील मनसेचे माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष होते. पक्षातील अंतर्गत वाद आणि गटबाजी यामुळे निलेश माझिरे पक्षाला रामराम ठोकणार आहेत. त्यांनी शिवसेनेचे संपर्क नेते सचिन अहिर यांची भेट घेतली होती.