पुणे : लिफ्ट देऊन त्यांना लुटणाऱ्या दोघांना अटक (Two arrested) करण्यात आली आहे. वाकड ते तळेगाव दाभाडे दरम्यान एका तंत्रज्ञ आणि व्यावसायिकाला 27 आणि 30 मे रोजी स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV)मध्ये लिफ्ट देऊन त्यांना लुटण्यात आले होते. याप्रकरणी दोघांना हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police) गुरुवारी अटक केली आहे. एसयूव्हीचे कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी आणि जेवण आणि दारू पार्टीवर पैसे खर्च करण्यासाठी दोघांनी हे गुन्हे केले असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी याविषयी माहिती दिली. अशा आणखी कोणत्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे का, याचा आम्ही तपास करत आहोत, असे हिंजवडी पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी सांगितले. याप्रकरणी दोन वेगवेगळ्या प्रकरणांतील फिर्यादींनी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्याप्रमाणे पोलिसांनी तपास करत या दोघांना अटक केली आहे.
किरण साळुंके (23) आणि समाधान शेटे (21, दोघेही रा. नवलाख उंब्रे, मावळ, पुणे) या दोघांकडून पोलिसांनी सहा स्मार्टफोन जप्त केले आहेत. त्याबरोबरच समाधान शेटे याच्या वडिलांच्या मालकीची एसयूव्हीही जप्त करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर म्हणाले, की एसयूव्हीच्या कर्जाचे हफ्ते थकले होते. त्याबरोबरच त्यांना दारूच्या पार्टीसाठी पैशांची गरज होती. म्हणून साळुंके आणि शेटे या दोघांनी पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांना लिफ्ट देऊन लुटण्याचा प्रकार सुरू केला.
पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा तसेच पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील उर्से आणि खालापूर टोलनाक्यावरील 80हून अधिक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासल्यानंतर या दोघांना ताब्यात घेण्यात आले. काटे म्हणाले, की पुणे-बेंगळुरू महामार्गावरील खेड शिवापूर येथील टोल प्लाझावरील सीसीटीव्ही फुटेज गोळा केल्यानंतर, तपासकर्त्यांनी एका विशिष्ट बनावटीच्या पांढऱ्या एसयूव्हीची तपासणी केली. यापैकी काही वाहनांची तपासणी केल्यानंतर, पोलीस हवालदार अरूण नरारे यांना नवलाख उंब्रे येथे अशाच एका एसयूव्हीबद्दल माहिती मिळाली. तेथे शेटे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. याने आपला सहभाग कबूल केला असून त्याच्या साथीदार साळुंकेचे नाव उघड केले आहे.