पुणे : बनावट कागदपत्रांचा वापर करून दोन जणांनी एका खासगी बँकेची 65 लाख रुपयांची फसवणूक (Cheated) केली आहे. बँक व्यवस्थापकाने दिलेल्या फिर्यादीनुसार वाकड पोलिसांनी (Wakad Police) गुन्हा दाखल केला आहे. बँकेचे व्यवस्थापक सौम्या गोपालन नायर (35) यांनी यासंबंधी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे, की आरोपी स्वप्नील मधुकर भूमकर (रा. भूमकर वस्ती) आणि प्रवीण शिंदे (रा. रहाटणी) यांनी बनावट आयटीआर वापरून कर्जासाठी अर्ज करण्यासाठी बँक स्टेटमेंटमध्ये फेरफार केला. पोलीस उपनिरीक्षक एस गिरनार, शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींपैकी एक हा आणखी तीन बँक कर्ज फसवणूक प्रकरणांशी संबंधित आहे, ज्यात त्याने आपल्या ग्राहकाला कर्ज मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर (Use of forged documents) केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेने प्रवीण शिंदे यांच्यामार्फत आलेल्या सर्व कर्ज अर्जांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. भुमकर यांनी बनावट बँक स्टेटमेंटसह 2014-15 आणि 2015-16ची बनावट आयटीआर कागदपत्रे सादर केल्याचे आढळून आले. सुरुवातीला, तो चांगला पगार आणि चांगले क्रेडिट रेटिंग राखण्यासाठी बँक खात्यात पुरेशी रक्कम हस्तांतरित करेल, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
आत्तापर्यंत पोलिसांनी वाकड परिसरात शिंदे यांच्यामार्फत तीन कर्ज अर्ज शोधून काढले आहेत. दरम्यान बँक व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC)च्या कलम 406, 420, 465, 467, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत तरी तीन अर्ज पोलिसांना मिळून आले आहेत. याआधी इतर कोणत्या कर्जप्रकरणात आरोपींनी काही फसवणुकीचे प्रकार केले का, इतर कोणते अफरातफरीचे व्यवहार केले, या सर्वांचा तपास आता पोलीस करीत आहेत.