पुणे : आठही विधानसभा मतदारसंघात आपण ताकदीने लढू, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहे, अशी माहिती शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरे (Sanjay More) यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते. शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नुकतीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुंबईत भेट घेतली होती. शिवसेनेतील पडझडीनंतर झालेल्या या भेटीत ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बळ दिले. सध्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल आहे. पुण्यातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. आगामी निवडणुकीत आम्ही शिवसेनेबरोबरच राहणार तसेच जिंकून येणार असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. याचविषयी संजय मोरे टीव्ही 9सोबत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपाकडून (Pune BJP) शिवसेनेवर होणाऱ्या अन्यायाचा पाढाच वाचला.
पुण्यातील शिवसैनिकांनी काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी पुण्यातील राजकारण आणि भाजपाकडून होणार अन्याय याविषयी ठाकरेंकडे तक्रार केली. 2019ला भाजपा-शिवसेना युतीमध्ये शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. आठही विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे गेले, असा सूर यावेळी काढण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपल्याही पक्षाची ताकद आहे, मात्र ती कधी दाखवणार? तुम्हाला काय हवे आहे ते आता तुम्हाला कळाले आहे. विधानसभा मतदारसंघात कामावर भर द्या, असे म्हटले.
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी सध्या शिवसैनिकांची रीघ लागली आहे. आम्हाला अखेर काल वेळ देण्यात आला. मर्यादित लोकांची बैठक असताना अनेकजण त्याठिकाणी उत्स्फूर्तपणे आले. खूप मोठ्या प्रमाणात बैठक झाली. उद्धव ठाकरे यावेळी पदाधिकाऱ्यांना म्हणाले, माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखे काही नाही, तेव्हा पदाधिकारीदेखील आम्हाला काही नको, तुम्ही आनंदी राहा, असे म्हणत पुन्हा भगवा फडकविण्याचा निश्चय शिवसैनिकांनी केला, अशी माहिती संजय मोरे यांनी दिली. तर पुण्यातल्या सर्व शिवसैनिकांनी फोन करत आम्हालाही उद्धव ठाकरेंना भेटायचे आहे, असे म्हटले. त्यामुळे पुन्हा वेळ मागून आम्ही मुंबईला जाणार, असे गजानन थरकुडे म्हणाले.