पुणे : पाषाण तलाव परिसरात (Pashan Lake area) अविवाहित जोडप्यांना बसण्यास बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पाषाण सुतारवाडी रस्त्यावर हा पाषाण तलाव आहे. तलावाच्या चारही बाजूने मोठ्या प्रमाणावर झाडी आहे. पुणे महापालिकेने (Pune municipal corporation) याठिकाणी उद्यान विकसित केले आहे. याठिकाणी काही गैरप्रकार घडत असल्यामुळे जोडप्यांना आतमध्ये सोडले जात नाही, असे प्रशासनाच्या वतीने सांगितले जात आहे. हा परिसर अत्यंत विस्तीर्ण आणि दाट झाली असलेला आहे. मात्र सुरक्षेच्या (Security) दृष्टीकोनातून हा परिसर म्हणावा तितका सक्षम नाही. सुरक्षारक्षक अत्यंत कमी आहेत. सकाळच्या शिफ्टमध्ये केवळ एकच सुरक्षारक्षक काम करत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
पाषाण तलाव परिसर विस्तीर्ण आणि दाट झाडी असून निसर्गरम्य परिसर आहे. मोठ्या प्रमाणात याठिकाणी तरुणाई येताना दिसते. त्यात विवाहित जोडप्यांसह अविवाहित जोडप्यांचीही वर्दळ पाहायला मिळते. मात्र याठिकाणी काही गैरप्रकार होत असल्याचे येथील ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे. अविवाहित जोडपी याठिकाणी आल्यानंतर त्यांचे वेगवेगळे प्रकार सुरू असतात, असे येथील सुरक्षारक्षकाने सांगितले. यावर ज्येष्ठ नागरिकांना आक्षेप आहे. त्यांच्याकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, असेही सुरक्षारक्षकाने सांगितले.
अविवाहित जोडपी आणि येथील स्थानिक नागरिक यांच्यात अनेक वादाची प्रकरणे याआधी झाली आहेत. पोलिसांपर्यंत अनेक तक्रारी गेल्या आहेत. येथे सुरक्षेचा मोठा मुद्दा आहे. जर ग्रुपने मुले आली, तर आमच्या सुरक्षेचे काय, असा सवाल सुरक्षारक्षकाने केला आहे. अनेकवेळा ही जोडपी आक्रमक असतात, मोठमोठ्याने बोलत अंगावर धावूनही येतात. अशांना उत्तर देणे अवघड होऊन बसते, अशी भिती सकाळच्या सत्रातील सुरक्षारक्षकाने व्यक्त केली आहे.
पाषाण तलाव परिसरात अविवाहित जोडप्यांना बंदी घातली. मात्र अविवाहित जोडपी ओळखायची कशी, असा सवाल केला जात आहे. याठिकाणची वर्दळ पाहता सरसकट अशाप्रकारचे निर्णय घेताना विचारपूर्वक घेतले जावेत, येथील सुरक्षा वाढवावी, अशा प्रकारची अपेक्षा सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.