पुणे | 15 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकांच्या तारखा उद्या जाहीर केल्या जाणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या तारखांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या तारखा जाहीर होण्यापूर्वीच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जागा वाटपांसाठी धावपळ सुरू केली आहे. चर्चा, खलबतं करून हा तिढा सोडवला जात आहे. महाविकास आघाडीचीही आज खलबत होत आहे. पण त्यापूर्वीच प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला दणका दिला आहे. महाविकास आघाडीने दिलेल्या जागा आम्ही नाकारत असल्याचं वंचित आघाडीने म्हटलं आहे. त्यासाठी वंचितने महाविकास आघाडीवर गंभीर आरोपही केला आहे.
महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला अवघा दोन जागांचा प्रस्ताव दिला होता. त्या सर्व हारणाऱ्या जागा होत्या. त्यामुळे या जागांचा प्रस्ताव आम्ही नाकारत आहोत. वंचितच्या पुण्यातील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वंचितचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी दिली आहे. महाविकास आघाडीने आम्हाला सुधारीत प्रस्ताव द्यावा. आघाडी कायम राहावी म्हणून आम्ही अकोला मतदारसंघही सोडायला तयार झालो होतो. पण केवळ मतं मिळवण्यासाठी आम्हाला पडणाऱ्या जागा सोडण्यात येत होत्या. ते योग्य नाही, असं सांगतानाच आम्ही आघाडीचा प्रस्ताव फेटाळत आहोत. आम्हाला चर्चेत सहभागी करून घेतलं जात नाही, असा आरोपही मोकळे यांनी केला आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
दरम्यान, वंचितला चार जागा सोडल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. कोणी कुणाला पाडत नाही. हे पाडापाडीचे भूत कुणाच्या मानगुटीवर का बसत आहे हे माहीत नाही. महाविकास आघाडीमध्ये कोणी पाडापाडी करणार नाही. आम्हाला भाजपला पाडायचे आहे. आम्हाला हुकूमशाहीला पाडायचे आहे हे प्रकाश आंबेडकरांना माहीत आहे, असं संजय राऊत म्हणाले.
आजची बैठक महाविकास आघाडी म्हणून होत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये एखाद दुसऱ्या जागेवरून चर्चा होत आहे किंवा शिवसेना आणि काँग्रेसमध्ये एखाद दुसऱ्या जागेवरून चर्चा बाकी आहेत, त्याची चर्चा होत आहे. या बैठका एकत्र होत नसून स्वतंत्रपणे होत आहेत. उद्या जर आम्हाला वाटलं प्रकाश आंबेडकर आणि आमच्यामध्ये चर्चा होणे गरजेचे आहे तर आम्ही त्यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करू, असंही राऊत म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीला आम्ही चार जागेचा प्रस्ताव दिला आहे. वंचितने आम्हाला ज्या 27 जागांची यादी दिली होती. त्यातीलच या चार जागा आहेत. महाविकास आघाडी हे कुटुंब आहे. त्यामुळे आघाडीच्या बैठकीत कधीही कुणीही येऊन चर्चेत भाग घेऊ शकतो. आमचा बैठकांचा सिलसिला सुरू नाहीये. काल आम्ही चांदवडला राहुल गांधी यांच्या यात्रेत सामील झालो होतो. तिथे शरद पवार होते. आमची राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली. त्यातील काही गोष्टींची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही पुन्हा एकत्र बसून चर्चा करणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.