योगेश बोरसे, पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणुक तोंडावर असताना वसंत मोरे यांनी मनसे पक्षाला जय महाराष्ट्र केलं आहे. वसंत मोरे यांच्या या निर्णयाने पक्षाला मोठा धक्का बसलाय. वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये आपल्या मनात जे काही होतं ते सर्व सांगितलं. पत्रकार परिषदेमध्ये वसंत मोरे यांना रडू आल्याचंही सर्वांनी पाहिलं. अशातच यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना आदेश दिल्याचं समोर आलं आहे.
वसंत मोरेंच्या राजीनाम्यावर कोणीही बोलू नका. राज ठाकरेंचे पुणे शहर मनसेच्या नेत्यांना आदेश, वसंत मोरेंच्या राजीनाम्यावर बोलण्यास पुणे शहर मनसे पदाधिकाऱ्यांची चुप्पी. मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि अजय शिंदे यांनी कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला. राज ठाकरेंच्या आदेशानंतर वसंत मोरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देणार असल्याचं ते म्हणाले.
मागच्या महिन्यात राज ठाकरे यांनी सर्व लोकसभा मतदारसंघाचे अहवाल मागितले होते. त्यामध्ये ज्या लोकांवर पुणे शहराच्या जबाबदाऱ्या होत्या त्या लोकांनी जो अहवाल तयार केला, पुणे शहरात मनसेची परिस्थिती अतिशय नाजूक आहे, असं जाणुनबुजून राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचल्या. एक निगेटिव्ह अहवाल पुढे पाठवला. तेव्हापासून पुणे शहरात मनसे पक्ष लोकसभेची निवडणूक लढवू शकत नाही, असे अहवाल गेले, या सर्वांचा वारंवार मला एकट्याला, मी एकनिष्ठ आहे, वेळोवेळी माझ्यावर अन्याय होतो. अखेर माझा कडेलोट झाल्यांचं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.
माझ्या माणसांवर चुकीच्या कारवाई होत असतील, त्यांच्याबरोबर राहून काय करायचं आहे? मी त्यासाठी राज ठाकरे यांच्याकडेही वेळ मागितली होती. पण राज ठाकरे सुद्धा मला बोलले नाहीत. मला वाटतं अशा पद्धतीने पुणे शहरात राजकारण होणार असेल तर अशा लोकांमध्ये न राहिलेलं बरं. माझा वाद आजपर्यंत राज ठाकरे आणि मनसे सोबत नव्हता, असं मोरे यांनी स्पष्ट केलं.