पुणे : राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मशीदीरील भोंग्यांबाबतच्या भूमिकेने पुणे मनसेत नाराजीचे नागारे वाजले आहेत. नाराज वसंत मोरेंना (Mns Vasant More) थेट अध्यक्षपदावरून हटवत साईनाथ बाबर (Sainath Babar) यांच्याकडे पुणे मनसेची धुरा देण्यात आलीय. मात्र वसंत मोरे हे नाव गेल्या दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालं आहे. वसंत मोरे यांना जरी अध्यक्षपदावरून हटवले असले तरी त्यांनी मनसेत राहण्याची इच्छाही उघडपणे बोलून दाखवली आहे. मात्र त्यांना गेल्या तीन-चार दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांकडून ऑफर असल्याचेही सांगितले आहे. अनेक नेत्यांनी तर खुलेपणे वसंत मोरे आले तर त्यांचं स्वागत आहे, असे थेट बोलून दाखवले आहे. त्यामुळे वसंत मोरे यांना याबाबत विचारले असता आता मला फक्त पंतप्रधानांचाच फोन यायचा बाकी आहे, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच अनेक जणांचे पक्षात प्रवेश करण्यासाठी फोन आल्याचेही सांगितले आहे.
राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष यांच्यापासून ते इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत येण्याची खुली ऑफर आहे. वसंत मोरे यांच्या जुन्या सहकारी तेव्हाच्या मनसे नेत्या आणि आत्ताच्या राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील यांनीही मोरे राष्ट्रवादीत आल्यास त्यांचे कधीही स्वागत आहे. तसेच मोरेंनी आधीच हा निर्णय घेतला असता, तर आज मोरेंवर अध्यक्षपदावरून हटवले जाण्याची दुर्दैवी वेळ आली नसती, अशी तिखट प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे. त्यामुळे मोरेंना राष्ट्रवादी त्यांच्या पक्षात घेण्यास जोर लावताना दिसत आहे. त्यामुळे वसंत मोरे काय निर्णय घेणार? याकडेही अनेकांचं लक्ष लागलं आहे.
पुणे महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने मैदानात उतरले आहेत. अशात वसंत मोरे यांच्यासारखा धाकड नेता त्यांच्या पक्षात असावा अशा अनेकांच्या भावना आहे. वसंत मोरे यांच्या पक्षात येण्याने पालिका निवडणुकीत ताकद वाढणार आहे. हे अनेकांना माहिती आहे. त्यामुळे वसंत मोरे यांना आपल्या पक्षात खेचण्यास जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. मी मनसेत राहण्यावर ठाम आहे, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे. राज साहेबांचा आदेश हा आमच्यासाठी शेवटचा आदेश आहे, मला मनसे सोडायची इच्छा नाही, साईनाथ बाबर माझाच कार्यकर्ता आहे त्यामुळे तो अध्यक्ष झाला तरी मला काही अडचण नाही, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे, त्यामुळे आगामी काळात मोरे याच निर्णयावर ठाम राहणार की मोरेंचा निर्णय वेळेबरोबर बदलणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.