पुणे : वडापाव आणि चहामहोत्सव अशाप्रकारचा पुण्यातला हा पहिलाच कार्यक्रम आहे. दोन-तीन महिन्यापूर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मिसळ महोत्सवाबाबत मार्गदर्शनन केले होते. मात्र त्यानंतर राज ठाकरेंचे ऑपरेशन झाले. त्यामुळे राज ठाकरे पुण्यात आले नाहीत, मात्र नागरिकांकडून या महोत्सवाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे, असे मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) म्हणाले. प्रभाग 56, 57 आणि 58 यांच्यावतीने वसंत मोरे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते. पुण्यातील कात्रज परिसरात हा महोत्सव आयोजित करण्यात आला. पावसाळा असल्यामुळे वडापाव आणि चहा महोत्सवाला पुणेकरांनी तुफान गर्दी केली. अशा पद्धतीने शहरात वेगवेगळ्या भागात वडापाव महोत्सवाचे आयोजन करणार असल्याचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) यांनी सांगितले.
वसंत मोरे यांनी पुण्यात मिसळ महोत्सव भरवावा, असा आग्रह करण्यात आला होता, मात्र आता पावसाळा असल्यामुळे मिसळ महोत्सव घेता आला नाही. मात्र पावसाळा संपल्यानंतर मिसळ महोत्सवाचे आयोजन करणार, असे वसंत मोरे म्हणाले. राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यान हेदेखील येथे आलेल्या पुणेकरांनी पाहावे, अशी विनंती यावेळी मोरे यांनी केली. दक्षिण पुण्यातील सर्वात सुंदर गार्डन असल्याचेही ते म्हणाले.
पावसाच्या आल्हाददायक वातावरणात गरमागरम वडापाव आणि चहा घेण्यासाठी पुणेकरांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे काही स्टॉल्सवरचे वडापाव लवकर संपले. त्यामुळे या स्टॉलधारकांनी आपले राखीव खेळाडू आपल्या हॉटेलमध्ये पाठवून द्या. माल कमी पडू देऊ नका. रांग मोठी आहे. इथे आलेल्या प्रत्येकाला सिंगल वडापाव तरी मिळेल, याची आपण काळजी घ्या, आम्ही संध्याकाळी जाताना तुमची काळजी घेऊ. येवले चहावाल्यांना दोन चारवेळा माल आणायला जावे लागले. त्यांनी जवळची एखादी फ्रँचायझी बंद ठेवा, पण इथे कमी पडू देऊ नका, असे वसंत मोरे म्हणताच हशा पिकला. यावेळी मनसेचे पुण्यातील नेते उपस्थित होते.