पुणे: पक्षाच्या कार्यक्रमाला बोलावून मला बोलायला दिलं जात नाही. कोणत्याही निर्णय प्रक्रियेत मला घेतलं जात नाही. माझ्यासोबत कोणी दिसलं तरी एकमेकांना फोनाफोनी केली जाते. माझ्यासोबत राहणाऱ्यांना तुझं तिकीट कापलं जाईल अशी धमकी दिली जाते. मला पक्षात वेगळं का टाकता? मी काय पुण्यातील पक्षातील दहशतवादी आहे का? असा संतप्त सवाल करतानाच राज ठाकरे यांच्याकडे तरी किती तक्रारी करायच्या? आणि कुणाकुणाच्या करायच्या? असा उद्विग्न सवाल पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी केला. टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी हा सवाल केला.
चार दिवसांपूर्वी मनसेने पुण्यात मेळाव्याचं आयोजन केलं होत. या मेळाव्याला वसंत मोरे यांना बोलावण्यात आलं होतं. पण त्यांना भाषण करू दिलं नाही. त्यामुळे वसंत मोरे नाराज झाले आहेत. मनसे कार्यकर्त्यांच्या वागणुकीवर त्यांनी जाहीरपणे संताप व्यक्त केला आहे. तसेच पक्षाच्या नेतृत्वाला घरचा आहेरही दिला आहे.
मी नाराज नाहीये. ज्या पद्धतीने कार्यक्रम होत आहे तो काही मला पटलेला नाही. परवा जो मेळावा झाला. त्या मेळाव्याला मी उपस्थित होतो. मला वाटतं मी गेली 15 वर्ष पुणे शहराचं नेतृत्व करतो. यशस्वी नेतृत्व करतोय. जेव्हा कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाचा विषय असेल तर अशा विषयात लोकप्रतिनिधींचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. पण परवाच्या मेळाव्यात मला साधं तुम्ही बोलणार का? असं विचारलंच नाही, असं वसंत मोरे म्हणाले.
या मेळाव्यात इतरांना विषय दिले. मलाही एखादा विषय दिला असता तर मी बोललो असतो. मी पाच साडेपाचला कार्यक्रमाला गेलो होतो. मेळावा तासभर उशिरा सुरू झाला. मला त्यात 10-15 मिनिटं बोलायला दिले असते तर मी बोललो असतो. मी टॉयलेटमधून बाहेर येईपर्यंत दिपप्रज्वलन झालं होतं.
मी एक तास आधी येऊन उभा राहिलो असं असतानाही दिपप्रज्वलनासाठी मी येईपर्यंत थांबले नाही. हे असं का केलं जातंय? मला वेगळं का टाकतात हे कळत नाही. पक्षात मला काय शिंगं आली की शेपटी आलीय? असा सवाल त्यांनी केला.
स्टेजच्या खाली आल्यावर तात्या तुम्ही का बोलला नाही? असं मला असंख्य कार्यकर्त्यांनी विचारलं. मला बोलू दिलं जात नाही, ही कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद आहे. मला चार पाच जणांनी विचारलं. मी म्हटलं मला विचारण्यापेक्षा मेळावा आयोजित केला त्यांना विचारा, असं ते म्हणाले.
या संदर्भात तुम्ही राज ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर किती तक्रारी करायच्या? कुणाकुणाच्या तक्रारी करायच्या? मीच फक्त तक्रारी करतोय अशी प्रतिमा माझा होऊ लागली की काय असं आता मला वाटू लागलं आहे.
म्हणूनच मी आता जे होईल ते सहन करायचं ठरवलं आहे. आता तक्रारी करत बसायच्या नाही. आता सहन करायचं. एकदिवस माझ्या विठ्ठलाला माझ्या यातना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कळतीलच, अशी खदखदही त्यांनी व्यक्त केली.
किती वेळा राज साहेबांकडे जाणार? किती वेळा वेदना मांडणार? मला बोलावलं नाही तरी मी कार्यक्रमाला जात असतो. मी सतत 15 वर्ष निवडून येणारा मनसेचा एकमेव नगरसेवक आहे. त्यामुळे मला का डावललं जातं? हा माझ्यावरचा रोष आहे का? की माझ्या कार्यकर्त्यांवरचा रोष आहे? पुणे शहरातील पक्षातील मी दहशतवादी आहे की काय? असं आता मला वाटू लागलं आहे, असंही ते म्हणाले.
माझ्या आवतीभोवती कोणी दिसलं तरी काही लोक एकमेकांना सांगतता तात्याकडे जाऊ नका. नाही तर तुझं तिकीट कट होईल. असं कसं तिकीट कट होईल? म्हणजे एक प्रकारची कार्यकर्त्यांच्या मनात दहशत निर्माण केली जात आहे. दहशत का निर्माण केली जाते? मलाच माहीत नाही, असं त्यांनी सांगितलं.
तुम्ही पक्षातून बाहेर पडणार आहात का? असा सवालही त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी नाही असं स्पष्टपणे सांगितलं. मी बाहेर पडण्याचा विचार केला नाही. मी आहे तिथे आहे. मागे माझ्या मुलाने पान भरून मेसेज केला. तात्या तुम्ही अपमान का सहन करता? असं मुलाने विचारलं, असं त्यांनी सांगितलं.
मलाही लोकांना उत्तर द्यायची आहेत. फालतू लोकं आम्हाला डावलायला लागले, टार्गेट करायला लागेल तर आमचं राहिलं काय पक्षात? एकनिष्ठ राहून राहिलं काय? आम्हालाही उत्तरं द्यावे लागतात. आम्हीही स्वयंभू आहोत राव.
ज्यांनी कधी निवडणूक लढवली नाही ते मार्गदर्शन करत असतील आणि आम्हाला पुतळ्यासारखं बसवत असतील तर कसं चालेल? मी काय शो पिस आहे का? मी कार्यक्रमाला गेलो नाही तरी माझा फोटो बॅनरवर लावता. मग बोलायला का देत नाही? असा सवालही त्यांनी केला.
मी राज साहेबांकडे या विषयावर बोललो आहे. त्यांनी दखल घेतली पाहिजे. निवडणुका तोंडावर आहेत. तुमच्याकडे कोणती टीम आहे? कोण उमेदवार आहे? उद्या राज साहेबांनी एकला चलो रे सांगितलं तर तुमच्याकडे उमेदवार आहेत कुठे? काय तयारी आहे तुमची? कधीही आचारसंहिता लागू शकते. डिसेंबरमध्ये आचारसंहिता लागू शकते. पण उमेदवार आहेत कुठे?, असा घरचा आहेरच त्यांनी पक्षाला दिला.
पक्षाची निवडणुकीची कोणतीही तयारी नाही. त्यामुळे पक्षाला फटका बसू शकतो. परीक्षेला जायचं असेल अन् त्याची तयारी केली नाही तर कसं पास होणार? सर्व गोष्टी साहेब येतील, ते ठरवतील तर मग तुमची कोअर कमिटी काय करते?
कुणाला काय प्लानिंग दिलं? निवडणूक जवळ आली आहे. कुणाला निवडणुकीची तयारी करायला सांगितली का? प्रत्येक गोष्टीत राज ठाकरे ठरवतील तर आपण काय करणार? असा संतप्त सवालही त्यांनी केला.