पुणे : संपूर्ण पक्ष पुण्यात होता. त्यामुळे पक्षाचे नेते असतील, नवीन शहराध्यक्ष असेल. एखाद्या लढाईला एखादा सेनापती नसला म्हणून कुणी लढाई हरत नाही, अशी प्रतिक्रिया मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते. तिरुपती बालाजी आणि त्यानंतर कोल्हापूरच्या अंबाबाईचे (Kolkapur Ambabai) दर्शन घेऊन ते पुण्याला परतले. मनसेत ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. ठाण्याच्या सभेवेळी आदल्या दिवशी राज साहेबांनी (Raj Thackeray) मला बोलावले होते. ठाण्यातील सभेला त्यांनी यायला सांगितले होते. तेव्हा माझ्या सख्ख्या भावाच्या मुलाच्या हळदीचा कार्यक्रम होता, तिथे गेलो नाही. मी जर आज ठाण्याच्या सभेला गेलो नाही, तर संभ्रम निर्माण होईल, म्हणून मी तिथे गेलो, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे कोणताही गैरसमज नसावा, असे त्यांचे म्हणणे होते.
दरवर्षी मी बालाजीला जात असतो. अक्षय्य तृतीयेच्या दरम्यानच जात असतो. सतरा-अठरा वर्ष झाली मी जातो. मागील दोन वर्ष कोरोनामुळे जाता आले नाही. मार्च-एप्रिलनंतर मी निवडून येईल आणि बालाजीला जाईन म्हणून जवळपास दीड महिने आधीच रिझर्वेशन केले होते. ठाण्याच्या सभेला राज ठाकरेंनी स्वत: बोलावल्यामुळे नाही म्हणता आले नाही. घरच्या हळदीचा कार्यक्रमही त्यामुळे बाजूला ठेवावा लागला. यादरम्यान, सगळे मनसे नेते संपर्कात होते, असेही त्यांनी सांगितले. तर मी नाराज नाही, केवळ शांत आहे. मागच्या काही महिन्यांपासून धावपळ झाली, असे ते म्हणाले.
माझा प्रभाग उपनगरामध्ये मोडतो, याठिकाणी भोंग्यांच्या प्रश्नी सर्व सुरळीत सुरू असल्याचे ते म्हणाले. रस्ता चुकतोय या स्टेटसवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. स्वामी विवेकानंदांचे ते स्टेटस मला आवडते. ज्यावेळेला तुमचा संघर्ष होत असतो, निंदानालस्ती होत असते, ज्यावेळी तुम्हाला अडचणी येतात तेव्हा समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तर बॅजवरूनही ते म्हणाले, की तिरुपतीला वर बॅज किंवा इतर कोणतेही झेंडे घेऊन जाण्याची परवानगी नाही. त्यामुळे दुसऱ्या गाडीतून गेलो. तर सोबत दोन बॅज ठेवले असल्याचे ते म्हणाले.