पुणे : पुण्यात 22 जूनला वाहन परवाना चाचणी (Driving license test) बंद राहणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे 22 जून रोजी पुण्यात आगमन होणार आहे. या भागातील रस्ते यादिवशी वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे 22 जून रोजी वाहनचालक परवाना चाचणी होणार नसून, ती 25 जूनला घेतली जाणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (Pune RTO) देण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे आळंदी रस्ता येथे दुचाकी चाचणी, ऑटोरिक्षा पुनर्चाचणी तर आयडीटीआर भोसरी याठिकाणी चारचाकीची परीक्षा घेतली जाते. दरम्यान, आळंदी रस्त्यावरून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी (Palkhi) येत असल्याने यादिवशीच्या सर्व चाचण्या रद्द करण्यात आल्या असून त्या 25 जूनला होणार आहेत.
वाहन चालविण्याच्या परवान्याकरिता ऐनवेळी गर्दी होऊ नये, याकरिता आरटीओकडून काही सूचना करण्यात आल्या आहेत. सध्या वाहन परवान्याव्यतिरिक्त स्कूल बस आणि इतर वाहन परवाने घेण्यासाठीही गर्दी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या सूचना करण्यात आल्या आहेत. तर 22 जूनला होणाऱ्या परमनंट वाहन परवान्याची चाचणी 25 जूनला होणार आहे. ज्यांना चाचणी करायची असेल, तसेच ज्या अर्जदारांनी पूर्वनियोजित वेळ घेतली आहे, अशा अर्जदारांनी शिकाऊ चाचणी अर्ज, शिकाऊ वाहन परवाना चाचणी आणि परमनंट लायसन्सच्या टेस्टसाठी 25 तारखेला उपस्थित राहावे, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा 20 आणि 21 जून रोजी होणार आहे. देहू येथून संत तुकाराम महाराजाची पालखी 20 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. तर 21 जूनला आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. माऊलींचा पहिला मुक्काम आळंदीतच नवीन दर्शन मंडपात राहणार आहे. तर बुधवारी (ता. 22) सकाळी आळंदीतून सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. पुण्यात दोन दिवसांच्या मुक्कामी पालखी राहील. त्यानंतर सासवडकडे मार्गस्थ होईल.