पुणे : काही दिवसांपूर्वीच राज्यात राज्यसभेच्या निवडणुका (Rajyasabha Election) पार पडल्या. यात महाविकास आघाडीला एका जागेचा फटका सहन करावा लागला. काही आमदारांनी दगा दिल्यामुळेच शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे विधान परिषदेसाठी (Vidhan Parishad Election) महाविकास आघाडी सतर्क झाली. मात्र आता ऐन विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) एका आमदाराची उघड नाराजी बाहेर आली आहे. मुख्यमंत्री भेटत नाही, वेळ देत नाही. आमच्या मतदारसंघातील कामं रखडली आहे. अशा तक्रारी गेल्या काही दिवसात अनेक अपक्ष आमदार आणि महाविकास आघाडीच्या मित्रपक्षातील आमदार करताना दिसून आले. आता राष्ट्रवादीच्या एका आमदाराने आपल्या मतदारसंघातील कामं रखडल्यानवरून थेट नाराजी व्यक्त केलीय. तशी तक्रारही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलीय. त्यामुळे आता पुन्हा राजकीय चर्चांणा उधाण आले आहे.
राज्यसभा निवडणुकीत मतदारसंघातील काम न झाल्यानं खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहीते हे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. खेडमधील काम मार्गी लावा अशी विनंती उपमुख्यमंत्र्या़नी मुख्यमंत्र्यांना केली असल्याचेही सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे स्थानिक शिवसेना नेते काम होऊ देत नसल्याचाही या राष्ट्रवादी आमदाराने आरोप केला आहे. त्यामुळे पुन्हा अंतर्गत धुसफूस बाहेर आली आहे. विधानपरिषद निवडणुकीआधी काम करा असा इशारा दिलीप मोहिते यांनी आधीच दिला होता. मात्र दोन तीन दिवसांत काम मार्गी लागतील अशी माहिती आता दिलीप मोहिते यांनी दिली आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीने विधान परिषदेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठीच 18 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक पार पडणार आहे. अजित पवार आमदारांची बैठक घेणार असल्याची माहिती समोर आलीय. या बैठकीतही काही आमदारांच्या समस्या, तक्रारी येण्याची शक्यता आहे. तसेच विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर कसे नियोजन करायचे याच्या सूचना या बैठकीत आमदारांना दिल्या जातील. मात्र आता आमदारांची नाराजी शांत करण्यासाठी महाविकास आघाडीलाही ठोस पाऊलं उचलावी लागणार आहे. कारण गेल्या अडीच वर्षात स्थानिक लेव्हलचा संघर्ष महाविकास आघाडीत अनेकदा दिसून आला आहे. अनेक आमदार, मंत्री आणि नेत्यांच्या तक्रारी आल्या आहेत. त्या योजनावरून, फोडाफोडीच्या राजकारणावर आणि निधीवरून आल्या आहेत. आता पुन्हा तीच समस्या महाविकास आघाडीला ऐन निवडणुकीच्या तोंडवर भेडसावते आहे.