पुणे : लोकसभा निवणुकीमध्ये महाराष्ट्राचं लक्ष लागेल्या बारामती मतदारसंघामध्ये मोठ्या हालचाली घडताना दिसत आहेत. पवार घराण्यामध्ये दोन्ही पवार कुटूंबासाठी ही लढाई प्रतिष्ठेची झाली आहे. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्य पत्नी सूनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली जाणार होती. मात्र शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याचां सांगितलं आहे. मात्र अशातच मोठा ट्विस्ट आला असून महायुतीकडून महादेव जानकर यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. यावर विजय शिवतारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ठिक आहे, लोकशाहीमध्ये लढण्याचा सर्वांना अधिकार आहे, महादेव जानकर 2024साली लढले होते. मला कळत नाही थोडं आश्चर्य वाटत आहे, की एका बाजूने सूनेत्रा पवार यांचा प्रचार सुरू होता. अचानक महादेव जानकर नाव का येत आहे, परंतु ठिक आहे. शेवटी कोण ना कोण लढणार आहे. मी जनतेचा प्रतिनिधी म्हणून उभा आहे, विजय शिवतारे नाव महत्त्वाचं नाही. जी पवारविरूद्ध जनता बारामती मतदारसंघात आहे त्यांचं प्रतिनिधित्त्व मी करत असल्याचं विजय शिवतारे म्हणाले.
महादेव जानकर सोडा आणखी कोणाला जरी ते घेऊन आले तरी विजय शिवतारे लढणार, जनता पाठिशी असल्यावर घाबरायचं काय? जे होईल ते होईल. पवारांच्याविरूद्ध असलेल्या लोकांना मतदानाची संधी देण्याचं पवित्र काम मी करत आहे. महायुतीला वाटतं का पन्नास वर्षे एकाच पवार घराण्याला आम्ही मतदान करावं का? आम्ही काय शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनाच करावं का? गेल्या १५ वर्षात त्यांनी एक रूपयाचं काम केलं आहे? असा सवाल विजय शिवतारे यांनी केला.
सेल्फी घेऊन किंवा संसदरत्न होऊन काम होत नाही. गुंजवणीचा प्रकल्प करण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले. मविआ सरकारमध्ये त्यांचे लहान भाऊ उपमुख्यमंत्री असताना त्यांनी काय प्रयत्न केले. साडे पाचशे कोटींची पाईपलाईन पडलीये किती बैठका घेतल्या. पुरंदरचे विमानतळ एका ठिकाणी होतं ते शिफ्ट का केलं? असं म्हणत शिवतारे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली.