पुणे : ‘गाणाऱ्या व्हायोलिनचे जादूगार’ अशी ख्याती असलेले ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांचे निधन झाले. रविवारी सकाळी आठ वाजता पुण्यातील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रभाकर जोग 89 वर्षांचे होते. सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी व्हायोलिन वादक म्हणून कारकीर्द गाजवली आहे.
आज दुपारी 11 ते 2 वाजताच्या सुमारास पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी प्रभाकर जोग यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर दुपारी दोन वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येईल. मराठी आणि हिंदी चित्रपट संगीतासोबत भावगीताच्या दुनियेतही ‘जोगकाकां’चे मोठे कार्य घडले आहे.
प्रभाकर जोग यांनी गजाननराव जोशी आणि नाराणराव मारुलीकर यांच्याकडून वयाच्या पाचव्या वर्षापासून गायन शिकायला सुरुवात केली. प्रभाकर जोग यांचे भाऊ वामनराव जोग हे आकाशवाणीवर व्हायोलिनवादक म्हणून नोकरी करत आणि घरी व्हायोलिनचे वर्ग घेत.
गीत रामायणाच्या 500 कार्यक्रमांना साथ
प्रभाकर जोग यांनी वयाच्या बाराव्या वर्षी व्हायोलिनचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पुण्यातील वाड्यांमधून त्यांनी व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम केले. एसपी कॉलेजच्या मैदानात भरलेल्या स्नेह संमेलनात व्हायोलिन वाजवत. यावेळी ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांनी जोगांचे व्हायोलिन वादन ऐकले आणि त्यांना भेटायला बोलावले. पुढे ते संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांचे सहाय्यक झाले. गीत रामायणाच्या सुमारे 500 कार्यक्रमांना प्रभाकर जोग यांची साथ होती.
‘गाणारे व्हायोलिन’
‘लपविलास तू हिरवा चाफा’ या गीतापासून प्रभाकर जोग हे स्वतंत्र संगीतकार म्हणून महाराष्ट्राला माहिती झाले. प्रभाकर जोग यांच्या व्हायोलिन वादनातून जणू शब्द ऐकू येतात, त्यामुळे त्यांचे व्हायोलिन ‘गाणारे व्हायोलिन’ म्हणून ओळखले जाते. प्रभाकर जोग यांची नातवंडे अमेय जोग आणि दीपिका जोगही रंगमंचावरुन व्हायोलिनचे कार्यक्रम करतात.
मुख्यमंत्र्यांकडून शोक
प्रभाकर जोग यांच्या निधनाने गाणारे व्हायोलिन आता मूक झाले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
व्हायोलिनला गायला लावणारा, शब्दांपलिकडे जाऊन त्यातून आर्त आणि हळव्या भावना व्यक्त करण्याची किमया साधणारा संगीत क्षेत्रातील एक सच्चा साधक आपण गमावला आहे. गदिमांच्या गीतरामायणातील अनेक प्रसंग जोग यांनी आपल्या व्हायोलिनच्या सुरावटींमधून जिवंत केले. त्यांच्या व्हायोलिनचे सूर आजही अनेकांच्या मनात रुंजी घालतात. संगीतकार सुधीर फडके यांचे सूर आणि त्यांना व्हायोलिनद्वारे साथसंगत करणारे प्रभाकर जोग अशी अनोखी पर्वणी कित्येक पिढ्यांसाठी राहिली आहे. संगीत क्षेत्रातील सच्चा साधक कसा असावा याचे प्रभाकर जोग आदर्श होते. यापुढे संगीत क्षेत्राला त्यांचे गाणारे व्हायोलिन आणि त्यांचे मार्गदर्शन यांची उणीव भासत राहील असे सांगून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
दिवाळीची रोषणाई करताना विजेचा धक्का, पतीचा मृत्यू, वाचवायला गेलेली पत्नी-मुलंही जखमी
बॉल टप्प्यात आला की सिक्सर लावणार, क्रिकेटच्या मैदानातून मंत्री दत्तात्रय भरणेंची राजकीय फटकेबाजी