पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अमोल मिटकरी, छगन भुजबळ आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी भूमिका जाहीर करावी. आम्ही पत्रकार परिषदेनंतर त्यांचा जाऊन सत्कार करू, असे वक्तव्य ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी केले आहे. ते पुण्यात बोलत होते. शरद पवार यांनी संध्याकाळी ब्राह्मण समाजाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ब्राह्मण महासंघ सहभागी होणार नाही, असेही ते म्हणाले आहेत. कारण फक्त चर्चा होणार आहे. तर अमोल मिटकरींची त्यांनी आज कान उघाडणी करावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने (Brahman Mahasangh) केली आहे. पवार साहेबांना ब्राह्मण समाजाच्या वेदना माहिती आहेत, त्यामुळे त्यांच्यावर नाराजी नाही, मात्र पक्षातील काही नेत्यांची त्यांनी कानउघडणी करावी, अशी अपेक्षा दवे यांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आणि छगन भुजबळ यांनी सातत्याने ब्राह्मणविरोधी वक्तव्य केले आहे, असा आरोप ब्राह्मण महासंघाने केला आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये एका सभेत मिटकरी यांनी मंत्रोच्चार म्हणून दाखवले होते. यावेळी त्यांनी कोणत्याही समाजाचे नाव घेतले नव्हते, मात्र त्यांचा रोख ब्राह्मण समाजाकडे असल्याचा आरोप करत ब्राह्मण महासंघ आक्रमक झाला.
जून 2018 मध्ये पुण्यात राष्ट्रवादीचा मेळावा झाला होता, त्यावेळी शरद पवार यांनी पुणेरी पगडी नाकारली होती. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात पेशवेकालीन पगडी नाही, तर फुले पगडीनेच स्वागत करा, असे आदेश पवारांनी दिले होते. तसेच त्यांनी त्यावेळी छगन भुजबळ यांचा पुणेरी पगडीऐवजी फुले पगडीने स्वागत केले होते. त्यामुळेही ब्राह्मण संघटना संतापल्या होत्या.
रामदास शिवरायांचे गुरू नाहीत, लाल महालातून दादोजी कोंडदेव यांचे शिल्प हटवण्यात आले होते. त्यालाही राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. भाजपाने संभाजी छत्रपती यांना राज्यसभेवर पाठवले होते. त्यावरून शरद पवार यांनी भाजपाला टोला लगावला होता. आता पेशवे छत्रपतींची नियुक्ती करू लागल्याचे विधान शरद पवार यांनी केले होते. संभाजी ब्रिगेड या आक्रमक संघटनेने सातत्याने ब्राह्मणांना टार्गेट केले आहे, मात्र त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीची मवाळ भूमिका असल्याचा आरोप ब्राह्मण महासंघाने केला. अशा काही मुद्द्यांवरून ब्राह्मण महासंघ राष्ट्रवादीवर नाराज आहे. त्यादृष्टीने आजची बैठक महत्त्वाची मानली जात आहे.