पुणे : महाराष्ट्र केसरी कुस्ती (Maharashtra Wrestling) स्पर्धा पार पडली. त्यानंतर सिकंदर शेख (Sikandar Sheikh) याची महेंद्र गायकवाड याच्यासोबत मॅच झाली होती. त्यानंतर पंचांनी चुकीचा निर्णय दिला. असा सोशल मीडियावर ट्रेंड झाला. त्यानंतर पंच असलेल्या मारुती सातव यांना धमकीचे फोन यायला लागले. तशी तक्रार त्यांनी पुण्याच्या कोथरुड पोलीस ठाण्यात केली. यासंदर्भात बोलताना महाराष्ट्र कुस्ती समितीचे अध्यक्ष संदीप भोंडवे (Sandeep Bhondve) म्हणाले, वादाची किनार लागायला नको होती. कारण पंचांनी योग्य निर्णय दिला होता. १४ जानेवारीला झालेल्या कुस्तीला आंतरराष्ट्रीय पंच मारुती सातव होते. चार पॉईंटची अॅक्शन झाल्यावर पंचांनी ते दाखविले.
परंतु, सिकंदर शेख यांच्या कोचला ते मान्य नव्हतं. त्यामुळं त्यांनी थर्ड अंपायरकडं अपील केलं. थर्ड अंपायरमध्ये प्रा. दिनेश गुंड, नवनाथ धमाळ, अंकूश रानवत हे काम करत होते. रिप्ले पाहिल्यानंतर चार पॉईंट महेंद्र गायकवाडला दिले. एक पॉईंट सिकंदर शेखला दिला, अशी माहितीही संदीप भोंडवे यांनी दिली.
या कुस्तीत सिकंदर शेख हरला. सिकंदरचा चाहता वर्ग नाराज झाला. त्यानं सर्व रोख पंचांवर टाकला. आज सकाळी पंच मारुती सातव यांनी मला फोन केला. मुंबईवरून संग्राम कांबळे नामक व्यक्तीनं फोन करून दमदाटी केली आहे. अशी माहिती दिल्याचं त्यांनी सांगितलं, असं संदीप भोंडवे म्हणाले.
दमदाटीचा ऑडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला. तुम्ही समितीचे अध्यक्ष आहात. आमच्या संरक्षणाची जबाबदारी तुमची आहे. आम्ही तुम्हाला अर्ज करणार, असंस सांगितलं. त्यांच्याकडून आलेल्या अर्जाच्या अनुसंगानं मी कोथरुड पोलिसांत तक्रार दाखल केल्याचं संदीप भोंडवे यांनी सांगितलं.
ऑडिओ क्लीप पोलिसांना पाठविली. त्यानंतर तक्रार केली आहे. पोलीस संरक्षण देण्यात यावं. ऑडिओ क्लीपचा तपास करावा, असं पोलिसांना सांगितल्याचंही संदीप भोंडवे म्हणाले. संग्राम कांबळेची तोंडओळख आहे. ज्या तालमीत सिकंदर व्यायाम करतो त्या तालमीचा तो माजी मल्ल आहे.
भारतीय कुस्ती महासंघानं ही कुस्ती स्पर्धा कोथरुडला देऊ केली होती. कुस्तीमध्ये राजकारण येणं कुस्तीपटूंसाठी धोकादायक असल्याचंही संदीप भोंडवे यांनी सांगितलं.