पुणे: मी काही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये फूट पाडत नाही. या दोन्ही पक्षाचे नेते हुशार आहेत. संजय राठोडांच्यावेळी भाजपने जरा आंदोलन केलं तर राठोडांचा राजीनामा घेतला. अनिल देशमुखांची (anil deshmukh) चौकशी सुरू होताच त्यांचा राजीनामा घेतला. मग नवाब मलिकांचा (nawab malik) राजीनामा का घेत नाही? शिवसेनेच्या मंत्र्याचा राजीनामा होतो, राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा का होत नाही? याचा शिवसेनेने विचार करावा, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी केला. 1993मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काय भाषणं केली ती सर्वांना माहीत आहे. येत्या काळात आम्ही ही भाषणं ऐकवणार आहोत. शिवसेनेने नेहमीच हिंदुत्वाच्या बाजूने भूमिका घेतली आहे. आताही शिवसेना हीच भूमिका घेणार का हा प्रश्न आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला. महाविकास आघाडीत असेपर्यंत शिवसेनेचं मतपरिवर्तन होऊ शकत नाही. किमान समान कार्यक्रमात एकमेकांच्या निष्ठा दुखवायच्या नाहीत हे त्यांनी ठरवलं आहे. शिवसेना त्या सत्तेत आहेत. त्या सत्तेतून बाहेर पडल्यावर ते सावरकरांचा घरीच पुतळा लावतील, असा चिमटा चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला काढला.
येत्या 6 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोच्या लोकार्पणाला येणार आहेत. यावेळी ते मेट्रोतून प्रवासही करणार आहेत. त्यामुळे त्या स्टेशनला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याची विनंती करणार आहे. त्याच दिवशी घोषणा झाली तरी बरं होईल. मी मोदींना मेल करून ही विनंती करणार आहे, असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादीचे नेते मेट्रोच्या उद्घाटनावेळी मोदींच्या समोर निदर्शने करणार आहेत. याकडे लक्ष वेधले असता, या देशातील लोकशाहीची ब्युटी अशी आहे की न कळणाऱ्या मुलांना त्याला जे काही करायचं ते करायचा अधिकार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला काय करायचं हा त्यांना अधिकार आहे, असं त्यांनी सांगितलं.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
बेनामी संपत्तीच्या आरोपाखाली ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. ईडीने अटक केली तरी त्यांचा राजीनामा घेणार नाही असं आघाडीचे नेते म्हणतात. याचा अर्थ 1993च्या बॉम्बस्फोटात सहभागी झालेल्या दाऊदच्या गुन्हेगारांना हे समर्थन करत आहेत. हे पाठबळ देत आहेत. त्यावेळचे बॉम्बस्फोट कसे बरोबर होते. त्यांना पाठबळ देणारे नवाब मलिक हे कसे बरोबर होते हे सांगण्याचा हा प्रयत्न सुरू आहे आणि भाजप हा प्रयत्न हाणून पाडेल, असा इशारा त्यांनी दिला.
संबंधित बातम्या: