पुणे : शिवसेना (Shivsena) उपनेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्या अडचणीत वाढ करणारी बातमी समोर येत आहे. रघुनाथ कुचिक यांनी लैंगिक अत्याचार (Abuse) केला असा आरोप करणारी पीडित तरुणी समोर आली आहे. कुचिक यांनी आपल्याला लग्नाचे आमिष देऊन लैंगिक अत्याचार केला, असा आरोप या पीडित तरुणीने टीव्ही 9सोबत बोलताना केला आहे. यासंदर्भात खासदार संजय राऊत आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याशीही संपर्क साधला, मात्र त्यांनी मदत केली नाही, असा आरोप या महिलेने केला आहे. इंजेक्शन देऊन बेशुद्धावस्थेत कोऱ्या कागदावर माझ्या सह्या घेण्यात आल्यात, असे या महिलेचे म्हणणे आहे. महिला आयोग, पुणे पोलिसांकडून आपल्याला मदत मिळाली नाही, म्हणून चित्रा वाघ यांच्याकडे जावे लागले, असे या महिलेने सांगितले आहे.
‘न्याय मिळाला पाहिजे’
मला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी या महिलेने केली आहे. मागील काही दिवसांपासून हे प्रकरण तापले आहे. ही महिला आता पुढे आली आहे. पीडित तरुणीने यासंबंधी तक्रारही दाखल केली होती. दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित गुन्हा गोव्यातील बेलीझा बाय दी बीच हॉटेल, मॉडेल कॉलनीतील (Modal colony) प्रबोधन फाऊंडेशन, प्राइड हॉटेल 6 नोव्हेंबर 2020 ते 10 फेब्रुवारी 2022 दरम्यान घडल्याचे तिचे म्हणणे आहे.याबाबत पोलिसात तक्रार करत कारवाईची मागणी केली होती.
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार शिवसेनेचे उपनेता रघुनाथ बबनराव कुचिक यांचे पीडित तरुणीसोबत प्रेम संबध होते. त्यांनी तरुणीला विवाहाचे अमिष दाखवले. या प्रेमसंबंधातून त्यांनी तरुणीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातूनच फिर्यादी गरोदर राहिली. पीडित तरुणानी जेव्हा त्यांना आपण गरोदर असल्याची माहिती दिली तेव्हा त्यांनी तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पडले. इतकेच नव्हे गर्भपात न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास वाईट परिणाम भोगायला अशीही धमकी देण्यात आली. त्यानंतर फिर्यादी आजारी असताना त्यांच्याकडून जबरदस्तीने समजुतीच्या करारनाम्यावर सह्या करून घेतल्या असल्याची माहिती तरुणीने दिली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी कुचिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.