पुणे : हडपसर (Hadapsar) येथील एका रहिवासी सोसायटीत एका महिलेने दोन भटक्या कुत्र्यांना (Stray dogs) ठार (Killed) मारले आहे. यापैकी एकाने तिच्या मुलाला चावा घेतल्याचे तिचे म्हणणे आणि आरोप आहे. हडपसर पोलीस ठाण्यात महिलेविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, 1960 आणि प्राण्यांना मारणे किंवा अपंग करणे या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या महिलेने 8 एप्रिलच्या रात्री आणि 9 एप्रिलच्या सकाळच्या दरम्यान दोन भटक्या कुत्र्यांना काठीने मारल्याचा आरोप आहे. हडपसर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक अरविंद गोकुळे म्हणाले, की आमच्या प्राथमिक माहितीनुसार, एका कुत्र्याने महिलेच्या मुलाला चावा घेतला होता. दोन कुत्र्यांनी चावा घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एका कुत्र्याचा मृतदेह सापडला असून, दुसऱ्याचा शोध घेणे बाकी आहे. दोघेही भटके कुत्रे होते.
या महिलेने परिसरातील सर्व भटक्या कुत्र्यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. रहिवासी तिच्याशी बोलण्यासाठी गेले असता तिने अपशब्द वापरले आणि रहिवाशांच्या पाळीव कुत्र्यांनाही मारण्याची धमकी दिली.