पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. स्वारगेट ते बुधवार पेठ अंडरग्राऊड मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. स्वारगेटवरून बुधवार पेठकडे येणारी मुठा टीबीएम मशिन (TBM) बुधवार पेठ स्थानकात बाहेर पडली आहे. एकूण 12 किमीचा हा मार्ग असून आता याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित भुयारी मार्गात (Underground route) सिग्नलिंग यंत्रणा, मेट्रोचे रूळ, विद्युत व्यवस्था अशी कामे करण्यात येणार आहेत. अंडरग्राऊंड दोन मार्ग आहेत. एक म्हणजे स्वारगेटकडे जाणारा आणि दुसरा स्वारगेटकडून येणारा. या मार्गात रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरू आहे. विद्युत यंत्रणा बसविण्याचे काम दुसऱ्या मार्गात सुरू आहे. मेट्रोसाठी हे दोन स्वतंत्र बोगदे तयार करण्यात आले आहेत. पुणेकर या मेट्रोची (Pune metro) वाट पाहत आहेत. त्यादृष्टीने या मार्गाचा महत्त्वाचा टप्पा आज पार पडला आहे.
जानेवारी 2022मध्ये पहिल्या बोगद्याचे काम पूर्ण झाले. मंडईपासून बुधवार पेठ मेट्रोच्या स्थानकादरम्यान दुसऱ्या बोगद्याच्या शेवटच्या टप्प्यातील जवळपास 1.2 किमी अंतराच्या खोदकामाला जानेवारीत सुरुवात झाली होती. हे काम करणारी मशीन टनेल बोअरिंग मशीन म्हणजेच टीबीएम आज बाहेर पडली आहे. हा भुयारी मार्ग न्यायालयापासून मुठा नदीच्या पात्रातून बुधवार पेठेकडे गेला आहे. या मार्गात स्वारगेट, मंडई, बुधवार पेठ, न्यायालय तसेच शिवाजीनगर अशी पाच स्थानके आहेत. मे अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र ते आज पूर्ण झाले आहे. तर पुढील वर्षातील मार्चपर्यंत भुयारी मार्गातील काही स्थानकांत मेट्रो धावू शकणार आहे.
एकूण बारा किलोमीटरचा हा टप्पा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आव्हानात्मक मानला जात होता. तो आता पूर्ण झाला आहे. या मार्गांसाठी टीबीएम मशीनचा वापर करण्यात आला होता. स्वारगेट येथून निघालेली टीबीएम मशीन नंतर बुधवार पेठ स्थानकात पोहोचली. त्यानंतर कामगारांनी जल्लोष केला. तिरंगा फडकावण्यात आला. उर्वरित कामही लवकरच पूर्ण केले जाणार आहे. यात सिग्नलिंग यंत्रणा, मेट्रोचे रूळ, विद्युत व्यवस्था आदी कामे बाकी आहेत.