खेड, पुणे : खासगी कंपनीत केबल गुंडाळण्याच्या मशीनमध्ये अडकून एका तरूण कामगाराचा मृत्यू (Worker dies) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील कनेरसर येथे असलेल्या स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये (SEZ) असलेल्या अॅबरेडर टेक्नॉलॉजिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत ही घटना घडली आहे. यामध्ये स्वस्तिक दयाराम शेलार असे मृत्यू झालेल्या 25 वर्षीय तरुणाचे नाव आहे. कंपनीत काम करीत असताना मशीनमध्ये हात जाऊन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तर कंपनीच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे. कंपनी प्रशासनाच्या विरोधात खेड पोलीस स्टेशनमध्ये (Khed police station) गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणाचा मोठा भाऊ प्रतीक दयाराम शेलार यांनी खेड पोलिसांत याबाबत फिर्याद दिली आहे.
यामध्ये त्याचा भाऊ स्वस्तिक दयाराम शेलार (वय 25) हा सायगाव या ठिकाणी राहत असून खेड तालुक्यातील कनेरसर येथील अॅबरेडर टेक्नॉलॉजिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत गेल्या सहा महिन्यापासून नोकरी करत होता. दिनांक 22 ऑगस्टच्या रात्री तो कामावर गेला असता कंपनीत अपघात झाला.
याबाबतची माहिती त्याच कंपनीत कामाला असलेल्या त्याचा आत्ये भाऊ योगेश यांनी दिली. त्यानंतर प्रतीक हा चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये गेला असता त्या ठिकाणी कंपनीचे कोणते कर्मचारी-अधिकारी उपस्थित नव्हते. त्या ठिकाणी पोलिसांनी स्वस्तिक दयाराम शेलार हा कंपनीमध्ये अपघात झाला, त्यात तो मृत झाल्याची माहिती त्यांना दिली. याबाबत कंपनीने हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा मुळे चालू मशीनमध्ये अडकून स्वस्तिकचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी या कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत स्वस्तिक याची घरची परिस्थिती बिकट असून घरातील एकुलता एक कमावता व्यक्ती होता. त्याचा मोठा भाऊ हा शिक्षित मात्र बेकार असून त्याचे वडील हे अंध आहेत तर त्याची आई मोलमजुरी करून घराला हातभर लावत आहे. स्वस्तिकच्या मृत्यूमुळे या कटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून खेड पोलीस उप निरीक्षक भारत भोसले हे पुढील तपास करत आहेत.