पुणे : पुण्याजवळील लोणावळा येथील ड्यूक नोज पॉइंट (नागफणी) (Duke’s Nose Trail) येथे एक पर्यटन बेपत्ता झाला आहे. दिल्ली येथील मेकॅनिकल इंजिनिअर शुक्रवारी दुपारपासून जंगलातून बेपत्ता (Missing) झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. इरफान शाह (24) असे या अभियंत्याचे नाव आहे. त्याने आपल्या भावाला फोन करून जंगलात रस्ता हरवल्याचे सांगितले होते. काही तासांनंतर, आता त्याचा फोनही बंद झाला आहे. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी हरवल्याची तक्रार नोंदवली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस (Lonavala Rural Police) आणि शिवदुर्ग ग्रुपचे स्थानिक स्वयंसेवक युवकाचा शोध घेण्यासाठी जंगल पालथे घालत आहेत. पोलिसांना त्याच्या भावाने या घटनेची माहिती दिली, त्यानंतर ड्यूक पॉइंटच्या आसपासच्या भागात त्याला शोधण्यासाठी पथके तयार करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिव दुर्ग स्वयंसेवकांसोबतच खोपोलीस्थित यशवंत हायकर्सचे सदस्यही ड्रोनच्या सहाय्याने परिसर स्कॅन करण्यात पोलिसांना मदत करत आहेत. पोलिसांसह बचाव पथकातील पन्नास सामाजिक स्वयंसेवक तरुणाचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम राबवत आहेत. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी सीताराम दुबल यांनी सांगितले, की बेपत्ता तरूण काही कार्यालयीन कामासाठी कोल्हापुरात आला होता. तो रोबोट बनवणाऱ्या कंपनीत काम करतो.
शाह कोल्हापूर, पुणे येथे एक दिवस थांबला आणि नंतर लोणावळ्यातील ड्यूक पॉइट येथे फिरायला गेला. कारण गिर्यारोहण ही त्यांची आवड होती. तो चुकीच्या दिशेने चालत असल्याचा संदेश त्याने आपल्या भावाला दिला, तेव्हा तो एकटाच होता आणि जंगलात त्याचा ट्रॅक हरवला होता. त्याच्या भावाने पोलिसांना माहिती दिली त्यानुसार आता पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, यापूर्वीही ड्यूक पॉइंट स्पॉटवरून लोक बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत.