पुणे : बैलगाडा शर्यतीदरम्यान (Bullock cart racing) एक वेगळाच थरार पाहायला मिळाला. एक तरूण थोडक्यात बचावला आहे. पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील लोणीकंद (Lonikand) येथे भव्य बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती, त्यादरम्यान ही घटना घडली आहे. बैलगाडा घाटात भिर्रर्रर्रचा नाद घुमताच शर्यतीचे बैल गाड्यांसह वाऱ्याच्या वेगाने धावू लागले आणि या बैलगाड्यांसमोर धावणाऱ्या घोडीचा धावताना पाय घसरला. ही घोडी घाटात कोसळली. या वेळी या घोडीवरील तरूणही खाली पडला. सुदैवाने या तरुणाने वेळीच प्रसंगावधान दाखवले आणि लगेच बाजूला गेला. त्यामुळे हा तरूण थोडक्यात बचावला आहे. अंगावर काटा आणणारा हा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद (Capture in camera) झाला आहे. लोणीकंद याठिकाणच्या या बैलगाडा शर्यतीत मोठ्या प्रमाणावर बैलगाडा मालक सहभागी झाले होते.
नारायण आव्हाळे पाटील युवा मंच आव्हाळवाडी यांच्यातर्फे ही बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे. हवेली तालुक्यातील लोणीकंद याठिकाणी ही स्पर्धा होत असून 5 मेला सुरू झालेली ही स्पर्धा 8 मेपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत जवळपास 27 लाख 27 हजार 727 रुपयांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. यात 1 लाख 51 हजारांचे पहिले, 1 लाखांचे दुसरे तर 75 हजार रुपयांचे तिसरे बक्षीस आहे. यासोबतच चांदीची गदा, मोटारसायकल यांसह विविध बक्षीसे ठेवण्यात आलीत. न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना परवानगी दिल्यानंतर शैतकरी उत्साहात दिसत आहेत. याठिकाणी झालेली गर्दी पाहून हेच दिसत आहे.
या बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून बैलगाडा मालक आपल्या बैलजोडीसह याठिकाणी आले आहेत. पाच ते आठ मेदरम्यान ही स्पर्धा होत असून बक्षीस पटकावण्याची स्पर्धा लागली आहे. दरम्यान, शर्यतीदरम्यान घोडीवरून तरूण पडल्याने सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. काही क्षणाचा विलंब झाला असता तर तरुणाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. त्यामुळे असे प्रकार होणार नाहीत, याकडे आयोजकांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.