अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात दाखल झालेत. अजित पवारांच्या टीकेला युगेंद्र पवार यांनी उत्तर दिलं आहे. बारामतीतील मतदान 7 मेला झाल्यानंतर ते दिसणार नाहीत. परदेशात जातील, अशी टीका मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. या टीकेला युगेंद्र पवार यांनी उत्तर दिलं आहे. मी बारामतीचाच आहे. जरी बाहेर कुणाला जायचे असेल तर त्याच्यात काही गैर नाही. गेली चार वर्षे दर सोमवार ते गुरुवारी मी बारामतीत असतो. लोकांशी संपर्क वाढल्यामुळे लोकं मला भेटतात, असं म्हणत युगेंद्र पवार यांनी अजित पवारांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
राज्यात चर्चेत असणाऱ्या मतदारसंघापैकी एक असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यानंतर विविध घडामोडी घडत आहे. मतदानाच्या सात दिवसांनंतरच अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात आज युगेंद्र पवार आहेत. इथे ते लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत.
आज अचानक पक्ष कार्यालयाला भेट का दिली? यावर युगेंद्र पवार यांनी भाष्य केलं. जेव्हा मी सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी फिरत होतो. तेव्हा लोक अनेक प्रश्न घेऊन आमच्याकडे येत होती. त्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. ते सोडवण्यासाठी आणि इतर अडचणी सोडवण्यासाठी लोकांना भेटण्याकरीता मी पक्षाच्या कार्यालयात आलो आहे, असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं.
बारामतीतील ईव्हीएम मशीन ज्या खोलीत आहेत. त्या खोलीचा सीसीटीव्ही 45 मिनिटे बंद होता, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. यावरही युगेंद्र पवार यांनी भाष्य केलं आहे. ही खुप गंभीर गोष्ट आहे. लोक अगोदरचं ईव्हीएमवर शंका व्यक्त करीत आलेत. लोकांच्या शंका दूर करण्यासाठी निवडणूक आयोग आणि यंत्रणेने अधिक काळजी घेतली पाहिजे. एक तास हे बंद असणं खूप चुकीचं आणि गंभीर आहे, असं युगेंद्र पवार म्हणाल्या.