नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या बंडाचा झेंडाचे निशाण फडकविणारा पाहिला आमदार असतांना मला विश्वासात घेतलं जात नाही म्हणून आमदार सुहास कांदे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. पालकमंत्री दादा भुसे आणि हेमंत गोडसे यांच्याबाबत सुहास कांदे यांनी पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली होती. पक्षातील नेमणुका असतील किंवा पालकमंत्र्याच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकांना निमंत्रण दिलं जात नाही म्हणून सुहास कांदे यांनी नाराजी व्यक्त करत असतांना मी एकनाथ संभाजी शिंदे या व्यक्तीवर प्रेम करणारा कार्यकर्ता असल्याचे कांदे यांनी म्हणत आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली होती. यावरून नाशिकच्या शिंदे गटात आलबेल नाही हे समोर येत असतांना आजच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः नाशिकच्या दौऱ्यावर आहे. आदिवासी महोत्सवाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे आणि खासदार हेमंत गोडसे यांचीही उपस्थिती असणार आहे. यावेळी सुहास कांदे हजर राहतील की गैरहजर राहतील अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल भागतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थित आज नाशिकमध्ये दुपारी तीन वाजता आदिवासी जनजातीय दिवस व राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत सर्वच लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले असून यावेळी नाराज आमदार सुहास कांदे उपस्थित राहतील का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
नाशिकच्या राजकीय वर्तुळात आमदार सुहास कांदे आणि पालकमंत्री दादा भुसे यांच्यातील संघर्ष वाढला असून हेमंत गोडसे यांच्यासोबत देखील कांदे यांचा सुप्त संघर्ष सुरू आहे.
येत्या काळात आमदार सुहास कांदे यांच्या मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध विकासकामांसाठी बोलावण्यात येणार असल्याने कांदे यांची नाराजी दूर होते का ? याबद्दल देखील चर्चा सुरू झाली आहे.
पक्षातील निवडी, पक्षाचे कार्यक्रम, शासकीय बैठकांना बोलावलं जात नाही, विश्वासात घेतलं जात नाही म्हणून सुहास कांदे यांनी पत्रकार परिषद घेत उघड नाराजी व्यक्त केली होती.
सुहास कांदे यांची नाराजीवर दादा भुसे यांनी बोलणं टाळत पक्षात सर्व काही आलबेल असल्याचे सांगितले होते, कांदे यांच्याबाबत मुख्यमंत्री बोलतील म्हणून भुसे यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळलं होतं.
एकूणच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर असतांना सुहास कांदे हजर राहतात का ? मुख्यमंत्री कांदे आणि भुसे यांच्यासह गोडसे यांच्यात समन्वय घडवून आणतील का ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.