परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतीची एका माथेफिरुने विटंबना केली होती. या घटनेनंतर परभणीत आंबेडकरी अनुयायांनी संताप व्यक्त करत आंदोलन केले होते. यावेळी जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले होते. यात सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलकाचा समावेश होता. पण सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत मृत्यू झाला. सोमनाथ सुर्यवंशीच्या पोस्टमॉर्टम अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. त्याचे गंभीर पडसाद सध्या राज्यात उमटत आहेत. आता याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज परभणी दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.
राहुल गांधी यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज २३ डिसेंबर रोजी राहुल गांधी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास नांदेड येथे विमानाने दाखल होतील. त्यानंतर दुपारी 2 च्या सुमारास ते परभणीत दाखल होतील. यानंतर राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधतील. त्यांचे सांत्वन करतील. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर संध्याकाळी ७.३० च्या विमानाने नांदेडहून दिल्लीला रवाना होतील. राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्याचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्यासोबत राज्यातील अनेक नेते उपस्थित असणार आहेत.
राहुल गांधी परभणीत येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्लीतील अनेक परभणीत तळ ठोकून बसले आहेत. राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यावर भाजपकडून टीका करण्यात येत आहे. राहुल गांधी हे फक्त राजकारण करण्यासाठी परभणीत जात आहेत. ते ढोंगी आहेत, अशा शब्दात भाजपने घणाघात केला. यावर संजय शिरसाट यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
“परभणीच्या घटनेत राहुल गांधी कुटुंबीयांना भेटायला जात आहे. राज्यघटनेची कशी विटंबना झाली, हे सरकारला दाखवण्यासाठी विरोधक तिथे जात आहेत. त्यांना सूर्यवंशी कुटुंबाशी यांच्याशी काहीही सहानुभूती नाही. ते फक्त राजकारणासाठी जात आहे. आज आम्ही बीड आणि परभणीला जात आहोत. आम्हाला जातीय सलोखा राखायचा आहे. जाती जातीत भांडण लावायची नाही. राहुल गांधी पक्षाचे धोरण म्हणून जात आहेत. आम्ही बीड परभणीला माणुसकी म्हणून जात आहोत”, असे संजय शिरसाट म्हणाले.
“बीड, परभणीमध्ये गेलो तर त्या ठिकाणी आम्ही वस्तुस्थितीची माहिती घेणार आहे. त्यावरून त्यांना न्याय कसा देता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेऊन त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना देणार आहोत. परभणी येथील घटनेत एकाचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांना भेट देणार आहे. त्या कुटुंबाला मदत कशी करता येईल, यासाठी आमचा प्रयत्न आहे. विरोधकांना फक्त राजकारण करायचं आहे. एखाद्या व्यक्तीचा जीव गेला आहे. तिथे विरोधक राजकारण करत आहेत. आम्हाला मात्र न्याय द्यायचा आहे”, असेही संजय शिरसाट यांनी म्हटले.