ते पण पुन्हा येतायेत? मविआचं टेन्शन वाढणार? महायुतीच्या गोटातून मोठी बातमी!

| Updated on: Dec 07, 2024 | 3:19 PM

विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महायुतीच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. यामुळे आता महाविकास आघाडीचं टेन्शन आणखी वाढण्याची शक्यात आहे.

ते पण पुन्हा येतायेत? मविआचं टेन्शन वाढणार? महायुतीच्या गोटातून मोठी बातमी!
Follow us on

राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महायुतीनं तब्बल 231 जागा जिंकल्या. भाजप हा महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष राहिला. भाजपनं 132 जागांवर विजय मिळवला. शिवसेना शिंदे गटाला 57 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र या निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसला, तीन प्रमुख पक्ष मिळून काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला एकत्र केवळ 50 जागाच जिंकता आल्या. दरम्यान त्यानंतर पाच डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.  त्यानंतर लगेचच मंत्रिमंडळाची पहिली बैठक देखील पार पडली.

दरम्यान आज पासून विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. या अधिवेशनात आमदारांच्या शपथविधीसह विधानसभा अध्यक्षांची देखील निवड होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी उद्या दुपारी बारापर्यंत अर्ज करता येणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा भाजपकडून राहुल नार्वेकर हेच विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज करणार आहेत. विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांचं नाव भाजपकडून जवळपास निश्चित झाल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत, त्यामुळे विधानसभा अध्यक्ष देखील आता भाजपचाच होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान राहुल नार्वेकर हे मंत्रिपदासाठी इच्छूक होते, महायुतीमध्ये यावेळी आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. त्यामुळे आता ते उद्या विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राज्यात दोन प्रमुख पक्षात पडलेल्या फुटीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीची पक्ष आणि चिन्हाची लढाई तसेच आमदार अपात्रतेचं प्रकरण हे सुप्रीम कोर्टात पोहोचलं. त्यानंतर आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालामुळे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. दरम्यान आता पुन्हा एकदा राहुल नार्वेकर हेच विधानसभेचे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे.