मुंबई : आज पावसात चालताना वेग वाढला. याच मातीतील आपण लोक आहोत. या गद्दारीत रायगडला (Raigad) काय मिळाले? मी पहिला आमदार आहे, की राजकारणात जे काही पहायचे होते ते पाहिले. कोविडचा काळ पाहिला. मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय या रायगडसाठी 600 कोटी दिले. आम्ही गद्दारांचे विधानभवनात चेहरे बघत होतो. चेहरे लपवून चालत होते. गेम झाल्याचे चेहऱ्यावर दिसत होते, असे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले. रायगडात शिवसंवाद यात्रेदरम्यान ते बोलत होते. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचा शिव संवाद यात्रेचा तिसरा टप्प्या रायगडात झाला. आदित्य ठाकरे यांनी भाजपा कार्यालयाच्या समोर शिवसैनिकांशी (Shivsainik) संवाद साधला. यावेळी सुरूवातीलाच तुम्ही घाबरू नका, ही लढाई तुमच्याविरोधात नाही, असे स्पष्ट करत बंडखोर आमदारांवर ते बरसले.
आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर देखील टीकेचे बाण सोडले. राज्यात उपमुख्यमंत्री हे खरे मुख्यमंत्री आहेत. मंत्रिमंडळ जाहीर व्हायला 41 दिवस लागले. या मंत्रिमंडळात रायगडचे कोणी नाही, मु़बईचे कोणी नाही, महिलांना स्थान नाही, अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
आदित्य ठाकरे यांनी जमलेल्या शिवसैनिकांना झेंडे खाली घेऊ नका, असे आवाहन केले. मी दिसलो नाही तरी चालेल पण झेंडा डौलात फडकला पाहिजे. हे गद्दारांचे सरकार आहे. कोसळणार म्हणजे कोसळणार. या लोकांना दुय्यम खाती मिळाली, आता पश्चाताप तोंडावर दिसतोय. यांना गरजेपेक्षा आणि लायकीपेक्षा जास्त दिले. यांना डोळेबंद करून मिठी मारली; यांनी पाठित खंजीर खुपसला, अशी खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, उठाव करायला ताकद लागते, यांनी पळून जाऊन गद्दारी केली. हे खरे शिवसैनिक असते तर डोंगर हॉटेल बघितले नसते तर त्याचवेळी आसामच्या पुरात मदतीला उतरले असते. खायला तिकडे अन्न नव्हते, मदत हवी होती. शिवसैनिक असते तर मदत करायला उतरले असते, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, दु:ख सरकारमधून बाहेर पडल्याचे नाही तर दु:ख याचे आहे यांना सर्वोतपरी मदत केली, तिकिटं दिली… फिरलो… सभा घेतल्या यांनीच गद्दारी केली, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
सरकार पडत असताना हे टेबलावर नाचत होते. हे तुमचे आमदार होतील, हे नेतृत्व तुम्हाला मान्य आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना केला. काय यांची वृत्ती आहे हे ओळखा. आजे जे घसा फोडून सांगत आहेत बाळासाहेब यांचे हिंदुत्व पुढे नेत आहोत. जरा तरी शिवसैनिक असते तर बाळासाहेबांचा मुलगा राजीनामा देत असताना तुम्ही पेढे भरवत नसता, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे म्हणाले, आज ही एकच म्हणणे आहे तुमच्यावर दडपण असेल कोणी काही बोलणार नाही. जर तुम्हाला तेथे आनंदात रहायचे असेल लाज उरली असेल तर राजीनामे द्या निवडणुकीला सामोरे जा होऊन जाऊदे; जनता कुणाला कौल देईल तो मला मान्य आहे. अजूनही काहींना वाटत असेल आपण चुकलो त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत, असा पुनरुच्चार आदित्य ठाकरे यांनी केला.
महाविकास आघाडी झाली तेव्हाही आपण आपली भूमिका बदलेली नाही. तिरूपती देवस्थानाला आपण महाराष्ट्रात जागा दिली. १० पुरातन मंदीरांसाठी फंड दिला. गड किल्यांसाठी फंड दिला. आपलं हिदुत्व सर्वांना पुढे घेऊन जाणारं हिदुत्व आहे. आपण शासन विकास करत होतो हे करताना कुठलाही जातीपातीचा वाद झाला नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
हे लोक महाराष्ट्राचे पाच तुकडे करतील. दंगली करतील, यांना महाराष्ट्र मागे खेचायचा आहे. मला तुमच्याकडून काही नको फक्त प्रेम आणि आशीर्वाद हवेत. ही गद्दारी शिवसेनेसोबत नाही महाराष्ट्रासोबत आणि माणुसकीसोबत केली. गद्दारीही केव्हा केली जेव्हा उद्धव ठाकरे हे रुग्णालयात होते. मी भारताबाहेरचा दौरा रद्द करणार होतो पण उद्धव ठाकरेंनी मला जायला सांगितले. पहिले ऑपरेशन नीट झाले पण दुसरे हे क्रिटिकल होते. त्यांना चालायला येत नव्हते, हालचाल होत नव्हती. याचवेळी हे गद्दार मुख्यमंत्री बनायची स्वप्न बघत होते; शिवसेना फोडण्याचा कट रचत होते. या गद्दारांना सर्व दिले, चांगली खाती दिली, तरीही गद्दारी केली. ही गद्दारी तरुणांना संदेश आहे, की चांगल्या लोकांना या राजकारणात संधी नाही हे दाखवण्यासाठी आहे. शिवसेनेला फोडा मराठी हिंदुमध्ये फूट पाडा ठाकरेंना एकटे पाडा हीच यांची इच्छा आहे, जे तुम्ही होऊ देणार नाही याची खात्री आहे, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.