रवी खरात, प्रतिनिधी, रायगड : उद्धव ठाकरे यांच्याशी बंडखोरी केलेल्या आमदार भरत गोगावले यांचा करेक्ट कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटात गेलेले आमदार भरत गोगावले यांच्या समोर उद्धव ठाकरे यांच्याकडून तगडे आवाहन दिले जाणार आहे. भरत गोगावले यांचे कट्टर विरोधक काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या तथा माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्या उद्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्ये प्रवेश होणार आहे. 6 मे रोजी उध्दव ठाकरे यांची महाड मध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेत स्नेहल जगताप या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
शिवसेनेच्या फुटीमध्ये महाडचे आमदार तथा शिंदे गटाचे पक्ष प्रमुख भरत गोगावले यांची भूमिका महत्वाची होती. त्यामुळेच उद्धव ठाकरे हे गोगावले यांच्यासमोर कडवे अव्हान उभे करीत आहेत. महाडचे माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप यांची कन्या आणि महाड नगर पालिकेच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांचा 6 मे रोजी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश होत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी महाडमधील चांदे मैदानावर सुरू आहे. ठाकरे गटाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहे. महाड, पोलादपूर तालुक्यातून माणिकराव जगताप यांचे अनेक समर्थक यावेळी मोठ्या संख्येने ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्नेहल जगताप यांच्या कार्यशैलीवर प्रभावित झाले. तसेच आमदार गोगावले यांच्या कार्य पध्दतीवर नाराजी व्यक्त केली. रोजगार, कारखानदारी, आरोग्य सुविधा यासाठी पुढील निवडणुकीत मैदानात उतरण्याची तयारी स्नेहल जगाताप यांनी केली आहे.
उद्या उद्धव ठाकरे यांच्या सभेत स्नेहल जगताप यांच्यासह किती कार्यकर्ते प्रवेश करतात,हे पाहावं लागेल. शिवाय उद्धव ठाकरे हे महाडच्या सभेत कुणाला लक्ष करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाने नियोजन करून ठाकरे यांची सभा जोरात घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे शिंदे गट वर्सेस ठाकरे गट असा सामना उद्या पाहायला मिळेल.