देवेंद्र फडणवीसांची संवेदनशीलता, आईला लेकीचे अंत्यदर्शन, युक्रेनमध्ये एमबीबीएस विद्यार्थिनीचा झाला होता मृत्यू

| Updated on: Feb 15, 2024 | 7:09 PM

Devendra Fadnavis | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संवेदनशीलतेमुळे आईला लेकीचे अंत्यदर्शन घेता आले. एमबीबीएसच्या विद्यार्थिनीचा युक्रेनमध्ये मृत्यू झाला होता. तिचे पार्थिव भारतात आणण्यासाठी फडणवीस यांनी सर्व प्रयत्न केले. रायगड जिल्ह्यातील रोहा येथे काल या विद्यार्थिनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

देवेंद्र फडणवीसांची संवेदनशीलता, आईला लेकीचे अंत्यदर्शन, युक्रेनमध्ये एमबीबीएस विद्यार्थिनीचा झाला होता मृत्यू
Follow us on

मुंबई | 15 February 2024 : रशिया-युक्रेनमध्ये गेल्या दोन वर्षांपासून युद्ध सुरु आहे. त्यातच युक्रेनमध्ये एका भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू ओढावला. रायगड जिल्ह्यातील रोहा येथील प्रचिती पवार हिचे अंतिम दर्शन व्हावे या काळजीने तिची आई हतबल झाली होती. अशा कठिण प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशीलतेचे दर्शन झाले. त्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले. मुलीचे पार्थिव मायदेशी आणले. मातेला मुलीचे अंत्यदर्शन घडले. रोहा येथे काल या विद्यार्थिनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. फडणवीस यांच्या या संवदेनशीलतेमुळे पवार कुटुंबियांनी आश्रू अनावर झाले. दुःखात फडणवीस यांनी मोठी मदत केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

युक्रेनमध्ये एमबीबीएस शिक्षणासाठी

प्रचितीचे वडील मुंबई पोलीस दलात होते. दहा वर्षांपूर्वी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. युक्रेन येथे एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात ती शिकत होती. केसपुळीचे निमित्त झाले आणि सेफ्टीक होऊन तिचा 2 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. आई देवयानी पवार आणि मामा डॉ.तेजकुमार अपनगे यांच्यावर मोठे संकट कोसळले. आता लेकीचे अत्यंदर्शन तरी होईल की नाही, यामुळे आई हतबल झाली होती. या संकटात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मदत करू शकतील याची खात्री असल्याने एका परिचिताने त्यांना मेसेज केला.

हे सुद्धा वाचा

फडणवीसांनी केली मदत

मदतीसाठी येणाऱ्या कोणत्याही मेसेजची दखल फडणवीस घेतात. या घटनेने देवेंद्र फडणवीस यांचे मन हेलावून गेले. त्यांनी तातडीने सूत्रे फिरवली. आपले खासगी सचिव दिलीप राजूरकर आणि दिल्लीतील स्विय सहाय्यक मनोज मुंडे यांना सूचना केल्या. फडणवीस स्वतः परराष्ट्र राज्यमंत्री व्ही .मुरलीधरन यांच्याशी बोलले. परराष्ट्र मंत्रालय आणि युक्रेनमधील भारतीय दूतावास यांच्याशी संपर्क साधून दिला. प्रचितीला मायदेशी घेऊन येण्याचे ऑपरेशन हाती घेण्यात आले. फडणवीस स्वतः प्रत्येक वेळी अपडेट घेत होते. आवश्यक सूचना करत होते.

आईला लेकीचे अंत्यदर्शन

सर्व अडचणी दूर होऊन प्रचितीचे पार्थिव मुंबई विमानतळावर पोहोचले. फडणवीस यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. भाजप सोशल मीडियाचे प्रदेश संयोजक प्रकाश गाडे तेथे उपस्थित होते. तेथून प्रचितीचे पार्थिव 14 फेब्रुवारी रोजी रोहा येथे पोहोचविण्यात आले. काल तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. युक्रेनपासून दिल्लीपर्यंत सर्व यंत्रणाशी देवेंद्र फडणवीस यांनी संपर्क केल्यामुळे एका मातेला लेकीचे अंत्यदर्शन घडू शकले. या बारा दिवसांच्या काळात सर्व धावपळीतून वेळ काढून फडणवीस स्वतः सगळे अपडेट घेत होते. त्याचबरोबर प्रचितीच्या कुटुंबीयांनाही प्रत्येक अपडेट पोहोचतील याची व्यवस्था केली होती.