पनवेल | 29 ऑगस्ट 2023 : ऑनलाईन गेम्स आणि त्यांच्या जाहीरातीवरून बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतरत्न परत करावा, अशी मागणी त्यांनी केलीय. सचिन तेंडुलकरने ऑनलाईन गेमिंगची जी काही जाहिरात केली. ती अतिशय वाईट आहे. सचिन तेंडुलकरच्या जाहिरातीमुळे घरंच्या घरं बरबाद होत असतील, तर हे योग्य नाही. त्यासाठी आम्ही आंदोलन करू. जर सचिन तेंडुलकरला जाहिरात करायची असेल तर त्यांनी भारतरत्न परत करावा. एक तर जाहिरात करणं बंद करा. नाहीतर भारतरत्न पुरस्कार परत करावा. या दोन्हीपैकी एक केलं पाहिजे. ते जर त्यांनी केलं नाही तर आम्ही आंदोलन करू, असं आमदार बच्चू कडू म्हणालेत. तसंच आपण राजकीय मौनव्रत धारण करणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. बच्चू कडू पनवेलमध्ये माध्यमांशी बोलत होते.
देशातील पहिला दिव्यांग मॉल पनवेलमध्ये होणार आहे. दिव्यांगांना पाहिजे ती वस्तू खरेदी करता येईल असा मॉल हा असला पाहिजे. प्रत्येक दिव्यागांच्या जवळ जाऊन माहिती आढावा घेणार आहे. 15 ते 20 जणांची टीम तयार करण्यात आली आहे. यातून एक धोरण तयार करत आहोत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आम्ही सर्व्हे करणार आहोत. चौदाशे कोटींचा निधी आहे. केंद्र आणि राज्याचा 5 टक्के निधी मिळत नाही. पण या निधीसाठी आग्रही मागणी धरत आहोत. महाराष्ट्र हा पहिलं राज्य आहे जिथे दिव्यांगांसाठी असं काम केलं जात आहे. इतर राज्यात कुठेही असं काम होत नाही, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.
आजपासून 16 ऑक्टोबरपर्यंत काहीही राजकीय बोलणार नाही. मी फक्त कांद्याच्या प्रश्नावर बोलणार आहे. इतर गोष्टींवर बोलणार नाही. 16 ऑक्टोबरपर्यंत मी राजकीय मौन पाळलं असून फक्त कांदा प्रश्नांवर बोलणार आहे. त्याच विषयी मी मुद्दे मांडणार आहे. कारण शेतकऱ्यांचे मुद्दे महत्वाचे आहेत, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
हमीभाव हा खूप कमी आहे. वाढलेले भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करतो तर कमी भाव वाढण्यासाठी कुठलंही सरकार का प्रयत्न करत नाही? भाव वाढल्यानंतर सरकार हस्तक्षेप का करतं? हे खरे समोर आणण्याची गरज आहे आणि ते आम्ही आणणार आहोत, असं बच्चू कडू म्हणालेत.