सुनील जाधव, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, रायगड | 18 फेब्रुवारी 2024 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार रायगडमध्ये आहेत. रायगडमध्ये अजित पवार यांच्या हस्ते विकासकामांचं भूमीपूजन झालं. यावेळी अजित पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. गाफील राहू नका. कुणी काही वक्तव्यं करतं तसं करू नका. जर असं कुणी वक्तव्य केलं तर त्याची नोंद देवेंद्र फडणवीस , रविंद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे घेतात. आमची यावर व्यवस्थित चर्चा झालेली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या भावना दुखवून घेऊ नका, असं अजित पवार म्हणाले.
आगामी निवडणुकीत ‘घड्याळ तेच वेळ नवी’ हे आपलं स्लोगन आहे. आपण युतीत आलो आहोत. पक्ष वाढवायचा आहे. काम करताना विरोधात प्रश्न विचारून प्रश्न सुटत नाही. त्यासाठी सत्तेत असणं गरजेचं आहे. लोकसभेत मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी निवडून आणून पुन्हा नरेंद्र मोदी यान्हा पंतप्रधान म्हणून निवडून आणायचे आहेत. लवकरच नमो मेळावे आपण घेणार आहोत, असं अजित पवार म्हणाले.
तुम्ही होम ग्राउंग सांभाळा… आपले महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करा. कुठे दगडफेक केली, कुठे शिवीगाळ केली अस आपण करू नका. निवडणूक 48 जागा मध्ये तिन्ही पक्षात त्यान्हा जागा मिळेल त्यान्हा मनापासून काम मारून त्यान्हा निवडून द्या. गेल्या वेळेस पेक्षा जास्त मतांनी इथे आपली सीट आणायची आहे.आपण सर्व उमेदवार आहात, असा विचार करून काम करा, असा सल्ला अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.
आधी महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिले. आता मात्र विरोधक सैरावैरा होऊन पाळत आहेत. कमलनाथ देखील पक्ष सोडत आहे, अशी माझ्याकडे माहिती आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. त्यासाठी अधिवेशन बोलावलं आहे. काही लोकांना झटपट निर्णय हवे मात्र मागच्या काळात चव्हाण मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस असताना आरक्षण कोर्टात मान्य झाले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलेलं आहे. त्याच्या चौकटीत राहून काम करावे लागतं, असं अजित पवार म्हणाले.