Raigad Irshalwadi Landslide Incident : इर्शाळवाडीमध्ये जोरदार पावसाला सुरुवात; बचावकार्यात अडचणी

| Updated on: Jul 20, 2023 | 12:58 PM

Raigad Irshalwadi Landslide Incident : रायगडमधल्या इर्शाळवाडीमध्ये पावसाला सुरुवात; बचावकार्यात अडचणी, NDRF च्या जवानांकडून मात्र शर्थीचे प्रयत्न

Raigad Irshalwadi Landslide Incident : इर्शाळवाडीमध्ये जोरदार पावसाला सुरुवात; बचावकार्यात अडचणी
Follow us on

इर्शाळवाडी, रायगड | 20 जुलै 2023 : रायगडमधल्या खालापूरमध्ये दरड कोसळल्याची घटना घडली आहे. खालापूरच्या इर्शाळवाडीमध्ये ही घटना घडली आहे. NDRF चे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. तिथं वेगात बचावकार्य केलं जात आहे. मात्र सध्या या दुर्घटनास्थळी पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे बचावकार्यत अडथळे येत आहेत.

जोरदार पावसामुळे दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. इर्शाळवाडी गावात झालेल्या दुर्घटनेचे बचाव कार्य आता वेगाने सुरू आहे. दळवळणासाठी चांगला रस्ता उपलब्ध नसल्याने आधीच बचावकार्यात अडचणी येत आहेत. अशातच या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मदत कार्यात अडचणी येत आहेत.

इर्शाळवाडीतील दुर्घटनेच्या ठिकाणी अलिबाग, खोपोली, कर्जत, लोणावळा, बदलापूर, पनवेल ,वाशी आणि मुंबईतून मदत पथकं रवाना झाली आहेत. 8 ॲम्बुलन्स, 44 अधिकारी कर्मचारी, 2 जेसीबी पनवेल महापालिकेकडून रवाना करण्यात आली आहेत. कळम, आंबिवली, मोहिल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारीदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

शिवभोजन थाळीच्या माध्यमातून जेवण्याची व्यवस्था

रायगडच्या इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त ठिकाणी सरकारकडून मदत पोहोचवली जात आहे. दुर्घटनास्थळी मोफत शिवभोजन थाळीची पाकीटं वाटली जाणार आहेत. राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी ही घोषणा केली आहे.

इर्शाळवाडीतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयातील दालनात अन्न, नागरी पुरवठा विभागच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. तातडीने मदत पुरवण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत.

इर्शाळवाडीच्या आजूबाजूच्या गावातील शिवभोजन केंद्रावरून ही पाकीटं उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसंच 5 लिटर रॉकेल, 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू किंवा गव्हाचं पीठ, तूरडाळ, तेल, साखर देखील देण्यात येणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.

मंत्री उदय सामंत म्हणाले…

इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत मंत्री उदय सामंत यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या दुर्घटनेची आणि मदतकार्याची माहिती दिली.

दुर्घटनाग्रस्त ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. TDRF NDRF च्या टीम त्या ठिकाणी पोहचल्या आहेत. जे लोक जखमी झाले आहेत. त्यांना आम्ही तात्काळ उपचार देत आहोत. स्थानिक प्रशासन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सर्व टीम पोहचल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

96 लोकांची या ठिकाणी ओळख पटवण्यात आली आहे. 7 जणांचा मृत्यू झाला आहे. 2 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. या घटनेसंदर्भात तातडीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली आहे. खराब हवामानामुळे त्या ठिकाणी हॅलीकॉप्टर पाठवता येत नाहीये. पण हवामान ठीक होताच हेलिकॉप्टरने मदत पोहचवू, असं सामंत म्हणालेत.