देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतं आहे. अशातच ठिकठिकाणी राजकीय नेत्यांच्या सभा होत आहेत. सुनील तटकरे यांचा मतदारसंघ असलेल्या रायगडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा झाली. या सभेतून शरद पवारांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.अनेक लोकांना समाजकार्यात येण्यासाठी आपण प्रोत्साहित करतो. त्यातील काही लोक आपल्या विचारांशी प्रामाणिक असतात काहीं लोक विचार सोडून देतात. आता जे काही झालं ते महाराष्ट्रातील माणूस पाहत आहे. त्यामुळं रायगड जिल्ह्याचा निकाल रायगड जिल्ह्याच्या परंपरेला शोभेल असा लागेल, असं शरद पवार म्हणाले.
रायगडमध्ये यश प्राप्त करायचं असेल तर आघाडीचे सर्व पक्ष एकसंघ राहतील याची काळजी घेतली गेली पाहिजे. शेतकरी कामगार पक्षाचे योगदान यात महत्त्वाचे आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असणारी शिवसेना, काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शेकाप यांच्या सामूहिक प्रयत्नातून यश मिळायला आता काही अडचण नाही. त्यामुळं कोण उभं राहिलं तरी काही अडचण नाही. या ठिकाणचे लोकं परिवर्तन करण्यासाठीं इच्छूक आहेत. त्यामुळं आमची महाविकास आघाडी ही जागा जिंकेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
यंदाची निवडणूक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तुतारी या चिन्हावर लढवत आहे. यावर शरद पवारांनी भाष्य केलं. मला त्यात काही अडचण वाटतं नाही. आमचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आणि अपक्ष उमेदवार याच ट्रम्पेट हे चिन्ह आहे. ट्रंपेट हे चिन्ह सातारा बारामती आणि माढा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. ट्रंपेट हे चिन्ह ज्याला मिळाला आहे ते चिन्ह पहिल्या 12 मध्ये येणार नाही आणि मशीनवर पहिले बारा चिन्ह येतात त्यामुळे ट्रंपेट चिन्ह बघायची वेळच येणार नाही, असं शरद पवार म्हणाले.
अमरावतीतील सायन्स कोर मैदानात सभेसाठी बच्चू कडू यांनी परवानगी मागितली होती. मात्र अमित शाह यांची या मैदानावर सभा होणार असल्याने बच्चू कडूंना परवानगी नाकारण्यात आली आहे. यावरही शरद पवारांनी भाष्य केलं आहे. या प्रकरणाची मला माहिती नाही. ज्यावेळी एखादा उमेदवार मैदान घेण्यासाठी अर्ज करतो आणि त्याला तो दिला जातो त्यावेळी दुसऱ्या उमेदवाराला मैदान देता येत नाही त्याची सभा पार पडल्यानंतरच दुसऱ्या उमेदवाराला मैदान देण्यात येते. जर त्यांना परवानगी दिली असेल आणि ती काढून दुसऱ्याला देण्यात येत असेल तर बच्चू कडू जे करत आहेत ते योग्य आहे, असं शरद पवार म्हणाले.