मुंबई | 24 जुलै 2023 : रायगडमधल्या खालापूरमध्ये दरड कोसळल्याची घटना घडली आहे. खालापूरमधल्या इर्शाळवाडी हे संपूर्ण गाव दरडीखाली आलं. चार दिवस या गावात शोधकार्य सुरू होतं. आज अखेर चार दिवसांनंतर हे शोधकार्य थांबवण्यात आलं. त्यावर ‘स्वराज्य’ संघटनेचे नेते संभाजीराजे छत्रपती यांनी भाष्य केलं आहे.
छत्रपती संभाजीराजे यांनी इर्शाळवाडीला भेट दिली. तिथल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. इर्शाळवाडीत नागरिकांना चौक या ठिकाणी कंटेनरमध्ये ठेवण्यात आलं आहे. या ठिकाणी सरकारकडून या ग्रामस्थांची निवाऱ्याची सोय केली आहे. तिथे संभाजीराजे यांनी भेट दिली. तेव्हा स्थानिकांना त्यांनी धीर दिला. धीर सोडू नका, आम्ही सगळे आपल्या पाठिशी आहोत, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.
इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृत झालेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहतो. तिथली परिस्थिती जाणून घेतली. सर्वांची सोय सरकारने केली आहे. पण त्यांचं पुनर्वसन लवकरात लवकर करावं, ही माझी सरकारकडे विनंती राहिल, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.
महाराष्ट्रामध्ये अशी अनेक गावं आहेत. ज्यांचं पुनर्वसन हे केलं गेलं पाहिजे. अशा धोकादायक स्थितीमध्ये राहणाऱ्या लोकांची माहिती घेऊन सरकारने या संदर्भात तात्काळ पावलं उचलली पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये सरकारी खाजगी संस्था आहेत. त्यांच्या मार्फत हा सर्व्हे केला गेला पाहिजे, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी या ठिकाणी येऊन पाहिली भेट दिली आणि सर्व यंत्रणा कामाला लावली. अनेक लोकांनी या ठिकाणी नागरिकांना दत्तक घेत आहेत. त्या प्रमाणे खाजगी संस्थानी सुद्धा दत्तक घ्यावं, असं आवाहनही संभाजी राजे यांनी केलं आहे.
त्याच बरोबर इर्शाळवाडी इथं मृत पावलेल्या नागरिकांच्या मुलांना शिक्षण देखील मोफत करावं. स्वराज्य संस्थेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. बाकीच्या ठिकाणाहून स्वराज्यचे कार्यकर्ते मदत करत आहेत, असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
इर्शाळवाडीत अनेकांना आपली घरं, संसार अन् हक्काची माणसं गमावली आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत 119 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. तर मृतांचा आकडा 29 वर पोहोचला आहे. अजूनही या दुर्गटनेतील 52 जण बेपत्ता आहेत. मात्र अपुऱ्या सुविधांअभावी चार दिवसांनंतर हे शोधकार्य थांबवण्यात आलं आहे.