रवी खरात, पेण : पेण तालुक्यातील वडखळ डोलवी हद्दीत जे एस डब्ल्यू कंपनीची कामगारांना घेऊन जाणारी बस पलटी झाल्याची घटना घडली. उचेड नजीक ब्रिजवर टायर फुटून बस पलटी होऊन अपघात झाला. बसमध्ये 17 ते 18 कामगार प्रवास करत होते. यात सहा प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपाचारासाठी संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस पलटी झाल्याने मुंबई गोवा महामार्गावरील लेनवर काही काळ वाहतूक खोळंबली होती. मात्र वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
पेणवरुन जेएसडब्ल्यू कंपनीची बस कामगारांना घेऊन कंपनीत चालली होती. उचेड नजीक ब्रिजवर सकाळी सव्वा नऊच्या सुमारास टायर अचानक फुटून बस पलटी झाली. बस पलटी झाल्याने मोठा अपघात झाला. या बसमध्ये 17 ते 20 कामगार प्रवास करत होते. सात ते आठ कामगार प्रवासी सध्या जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. यानंतर वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले.
इंद्रजित शंकरचंद्र सहा, प्राजक्ता श्रीराम मोडक, दिशाली विवेक पाटील, राहुल सदाशिव पाटील, चालक सुमित सुभाष जुईकर, देवेंद्र जगदिश भोईर अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेश रुईकर अधिक तपास करीत आहेत.