मुंबई/रायगड : सरकार आमचे होते ते देखील गतिमान होते. हे सरकार तर प्रचंड गतीमान आहे. गेली 40 वर्ष जनतेत काम करत आहे. रस्त्याचा विषय हा राजकारण करण्याचा नाही, अशी टीका रवींद्र चव्हाण यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी केली आहे. कोकणातील रस्त्यांवरून रवींद्र चव्हाण आणि सुनील तटकरे यांच्यात वाक् युद्ध सुरू आहे. सुनील तटकरे म्हणाले, की मी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना विनंती केली आहे. मात्र हा काही राजकारणाचा विषय नाही. पुढील वर्ष, दीड वर्षांत काम होईल. कोकणात अतिवृष्टी होत असल्यामुळे डांबरी रस्ते टिकत नाहीत. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडत आहेत. सातत्याने पाऊस आहे. अशावेळी ज्या पद्धतीने खड्डे (Potholes) भरले जात आहेत, ते टिकणार नाही. त्यामुळे सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करायला हवे, असे सुनील तटकरे म्हणाले.
रस्त्यांवरचे खड्डे ही कोकणातील मोठी समस्या आहे. हे खड्डे भरण्यासाठी टेक्नॉलॉजी बदलली पाहिजे. मंत्री म्हणून मी त्यांचे स्वागत करतो. मात्र त्यांनीदेखील राजकारण करू नये. उदासीनता आणि गतीमानता अजून स्पष्ट झाली नाही. नव्याची नवलाई अजून दिसून यायची आहे, असा टोला त्यांनी रवींद्र चव्हाण यांना लगावला आहे.
रवींद्र चव्हाण यांनीदेखील त्यांच्यावर पलटवार केला आहे. सुनिल तटकरे काय म्हणतात, याला महत्त्व नाही. त्यांना खरेच वाटत असावे की भाजपा आणि शिंदेंचे सरकार हे गतीमान सरकार आहे, म्हणून ते बोलले असतील, असा टोला त्यांनी लगावला आहे. जिथे दोन जण काम करत होते तिथे आम्ही 10 जण कामाला लावली आहेत. तटकरे यांनी कितीही टीका केली तरी आमचे सरकार हे गतीमान आहे. भविष्यात कल्याण-डोंबिवली आणि इतर शहरातही खड्डे बुजविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, ती त्यांना भरघोस निधी नगर विकास खात्यातून या सगळ्या महापालिकांना द्यावा, अशी विनंती त्यांनी केली.