पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान मनसे नेते वसंत मोरे यांची नाराजी दूर होईल का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. त्याचे कारण म्हणजे राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचणारे एक पत्रक जाहीर केले होते. त्यानंतर वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर किंवा मिडियासमोर येऊन प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यातच पुणे दौऱ्यावर निघालेल्या राज ठाकरे आणि वसंत मोरे यांची भेट होणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या जनसंपर्क कार्यालयाचं उदघाटन होणार आहे. दुसऱ्या दिवशी सहजीवन व्याख्यानमालेत सहभागी होणार आहे. याशिवाय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे बैठक घेणार आहेत. यामध्ये राज ठाकरे यांनी पत्रक काढल्यानुसार वसंत मोरे यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांची भेट होणार का? याचीही चर्चा मनसे वर्तुळासह राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.
राज ठाकरे यांनी काढलेल्या पत्रकात काय म्हंटलं होतं ते पाहा :
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र,
सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाट्टेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे. माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स ह्याच्याने हे सगळे शेफारले आहेत. इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे मी खपवून घेणार नाही.
माझ्या पक्षातल्या कोणालाही, पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्यांशी बोला, माझ्याशी बोला. पण हे सोडून जर थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल, तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची आहे ती करा. पक्षात राहून असे प्रकार केलेत, तर हकालपट्टी अटळ आहे हे लक्षात ठेवा.
ही समज नाही तर अंतिम ताकीद आहे ह्याची नोंद घ्या !
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील प्रत्येकाने पक्षशिस्त पाळायलाच हवी ! pic.twitter.com/42cuKigAWk
— Raj Thackeray (@RajThackeray) December 21, 2022
असे वरील आशयाचे पत्रक राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केले होते, हे पत्रक जाहीर करण्यापूर्वी काही दिवस अगोदर पुण्यातील वसंत मोरे यांची पक्षातील धुसफूस समोर आली होती.
त्यानंतर पुण्यातील पदाधिकारी आणि वसंत मोरे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता, त्यामुळेच की काय राज ठाकरे यांनी थेट पत्रक काढून संताप व्यक्त करत मनसे नेत्यांना दमच भरला होता.