लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. महायुतीच जागा वाटप अजून रखडलेलं आहे. मनसेच्या महायुतीच्या प्रवेशाच्या चर्चांमुळे ते अद्याप पूर्ण झालेलं नाही असं दिसतंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीसोबत जाण्याची शक्यता आहे. मागच्या दोन-तीन दिवसांपासून त्या संदर्भातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यासंदर्भात स्वत: राज ठाकरेंनी दिल्लीत जाऊन भाजप नेते अमित शाहांची भेट घेतली. तर त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही रात्री गुप्त बैठक झाली. हे कमी की काय म्हणून गुरूवारी दुपारी वांद्रयाच्या ताज लॅन्डस हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरेंची पुन्हा तास-दीड तास बैठक झाली.
मात्र त्यानंतरही मनसेच्या महायुतीतील प्रवेशाबद्दल अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. येत्या एक-दोन दिवसांतच राज ठाकरे हे त्यांचा निर्णय जाहीर करतील अशी चिन्हं दिसत आहेत. त्यात मनसेला महायुती कसं सहभागी करुन घेणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. एकाबाजूला महाविकास आघाडीत वंचितच्या सहभागाची शक्यता मावळलेली असताना दुसऱ्याबाजूला मनसेच्या महायुतीमधील सहभागाबाबत सकारात्मक गोष्टी घडत आहेत.
मनसेला हव्यात दोन जागा
दरम्यान, मनसेला दोन जागा हव्या असल्याचं सांगितलं जात आहे. शिर्डी किंवा नाशिक आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर मनसेने दावा केला आहे. त्यामुळे महायुतीकडून त्यांना या जागा दिल्या जातात का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनसेला दक्षिण मुंबई, नाशिक किंवा शिर्डीची जागा सोडली तर मनसेचे नेते बाळा नांदगावकर उभे राहण्याचे सांगितलं जात आहे. नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वीच मनसेने मोठी सभा घेतली होती.
भाजपने महाराष्ट्रातील 20 जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे 28 जागा उरल्या आहेत. या 28 जागांमधील काही जागा भाजपच्या आहेत. तर उरलेल्या जागा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देण्यात येणार आहेत. त्यातूनच मनसेला दोन जागा सोडण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
ताज लँड्समध्ये एक कप चहा कितीला ?
दरम्यान गुरूवारी दुपारी वांद्रे येथील ‘ताज लँड्स’ या फाइव्ह स्टार हॉटेलच्या 19व्या मजल्यावर राज ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. तास-दीड तास या तिघांमध्ये हॉटेलच्या रूममध्ये चर्चा सुरू होती.
सध्या चर्चेत असलेल्या या हॉटेलचं नाव निघताच फाइव्ह स्टार स्टाइल जेवणाची आठवण येते. विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि फाइनव्ह स्टार ट्रीटमेंट हे इथलं वैशिष्ट्य. मात्र या हॉटेलमध्ये एक कप चहा प्यायचा असेल तर त्याची किंमत किती आहे माहीत आहे का ? ताज लँड्समध्ये एक कप चहाची किंमत साधारणत: 550 रुपयांच्या आसपास आहे. तर एक कप कॉफी ही 500 ते 600 रुपयांच्या दरम्यान असते असं समजतं.