रायगड | 16 ऑगस्ट 2023 : राज्याच्या राजकारणात महत्त्वाचा घडामोडी घडत असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घालण्यास सुरुवात केली आहे. चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी होणाऱ्या त्रासाचा मुद्दा त्यांनी उचलला. मुंबई गोवा महामार्ग गेल्या 17 वर्षांपासून रखडलेला असून रस्त्याची अक्षरश: चाळण झाल्याचं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. त्यानंतर त्याची उत्स्फुर्त प्रतिक्रिया उमटली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी माणगावमधील चेतक सन्नी कंपनीचं कार्यालय फोडलं. त्यावेळी खुर्च्यांची तोडफोड केली. तसेच घोषणाबाजी करत आक्रमक पवित्रा दाखवून दिला.
“चंद्रयान जे गेलंय चंद्रावर काय उपयोग आहे आपल्याला तिथे जाऊन खड्डेच बघायचे आहेत. ते जर महाराष्ट्रात सोडलं असतं खर्चही वाचला असता. हा महाराष्ट्रातील कोकणाचा भाग नाही. मुंबई नाशिक रस्त्याचीही तिच अवस्था आहे. महाराष्ट्रातील अनेक रस्त्यांची हीच अवस्था आहे. मला महाराष्ट्रातील लोकांचं कौतुक वाटतं की, हे खड्डे काही आज नाही पडलेत. 2008 साली मुंबई गोवा रस्त्याचं काम सुरु झालं. काँग्रेसचं सरकार होतं. त्यानंतर शिवसेना भाजपाचं सरकार आलं. एवढी सरकारं आल्यानंतर खड्ड्यातून इतकी सर्व लोक जात असताना त्याच त्याच पक्षातील लोकांना तुम्ही मतदान कसं करता.”, असा प्रश्न राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
माझ्या महाराष्ट्र सैनिकांना माझं आवाहन आहे की, ह्या राज्यातील कोणताही महामार्ग असो की शहरातील अंतर्गत रस्ते असो, सर्वत्र खड्डेच खड्डे आहेत. तेंव्हा ह्या खड्ड्यांमध्ये झाडं लावा, किमान ह्यामुळे तरी प्रशासनाचं रस्त्यावरच्या खड्ड्यांकडे लक्ष जाईल. pic.twitter.com/izgV0Q4Khv
— Raj Thackeray (@RajThackeray) August 16, 2023
“आत्तापर्यंत मुंबई गोवा महामार्गावर खर्च झालेला पैसा १५,६६६/- कोटी रुपये आहे. तरीही रस्ता झाला नाही. फक्त काहींच्या तुंबड्या भरल्या गेल्या. मी नितीनजींना विनंती केली होती की तुम्ही वैयक्तिक लक्ष घाला तर ते म्हणाले की अहो कॉन्ट्रॅक्टर पळून जातात. हे नेमकं मुंबई गोवा हायवेच्या बाबतीतच का घडलं? कोकणाचा विकास होऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करतंय का?”, असंही राज ठाकरे यांनी पुढे सांगितलं.
“भारतीय जनता पक्षाने मध्यतंरी सल्ला दिला की मनसेने रस्ते आणि टोल बांधायला पण शिका. त्यांना इतकंच सांगतो की, दुसऱ्यांच्या आमदारांना फोडून आणायच्या ऐवजी स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका आणि पक्ष बांधायला शिका. नको ते सल्ले आम्हाला देऊ नका.”, असा टोलाही राज ठाकरे यांनी लागवला.