कणकवली : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठींबा दिल्यानंतर त्यांनी प्रथमच कणकवलीत भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नेहमीच्या शैलीत टोलेबाजी केली. देशात उभी फूट पडली आहे. राज ठाकरे पुढे म्हणाले की मित्राची खरडपट्टी काढताना मागे पुढे पाहू नये आणि दुश्मनाची स्तुती करताना मागे हटू नये. आज देशात उभी फूट पडली आहे. एक तर मोदींच्या बाजूने किंवा विरोधात अशी ही फूट असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले. यावेळी राज ठाकरे यांनी आपले चुलत भाऊ उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
कणकवलीत भाजपा प्रणित एनडीएचे उमेदवार नारायण राणे उभे राहिलेल्या सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा मतदार संघात येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्याचे मतदान आहे. राणे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या पहिल्याच सभेत राज ठाकरे यांनी आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली. मला काही मुख्यमंत्री व्हायचं होते. मला हे हवं होते. ते दिले नाही म्हणून मी मोदींच्या विरोधात. मी तसं केलं नाही. मी भूमिकेच्या विरोधात होतो. उद्धव ठाकरे काल आले ना. अडीच अडीच वर्षाचं झेंगाट होतं ना. समजा त्यावेळी भाजपने तुमचे अडीच वर्ष मान्य केले असते. तर आज जे मागत आहेत, ते मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर बोलला असता का? सत्तेचा बोळा तोंडात आला म्हणून बोलला ना अशा शब्दात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खरपूस टीका केली.
राज ठाकरे पुढे म्हणाले की उद्धव ठाकरे काल बोलले की कोकणातील उद्योगधंदे गुजरातमध्ये जात आहे. 2014 ते 2019 त्यांच्यासोबत सत्तेत बसला होता ना. 2019 मध्ये तुम्ही मुख्यमंत्री होता. तुम्ही दहा वर्षातील साडे सात वर्षे सत्तेत होता. का नाही विरोध केला? उद्योगधंदा आला तर खासदार विरोध करणार आणि आमदार पाठिंबा देणार.आपण का विरोध करतो? माहीत आहे ? का माहीत नाही असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी केला.
ते पुढे म्हणाले की जैतापूरचा अणू ऊर्जा प्रकल्प. त्याचा स्फोट झाला तर काय होईल? मी यादी वाचून दाखवतो. जगातील बोलत नाही. भारतात अणू ऊर्जा प्रकल्प कुठे? कुठे? आहेत. काकरापोर गुजरात, मद्रास, नानोरा उत्तरप्रदेश, काझगा कर्नाटक, राजस्थान, तारापूर महाराष्ट्र, कुंदकुलम तामिळनाडू एवढे अणू ऊर्जा प्रकल्प आता भारतात आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्या स्फोट झाला तर किती माणसं कोकणात मरतील. याची चिंता वाहणाऱ्यांना हे माहीत नाही का ? भाभा ऑटोमिक सेंटर मुंबईत आहे. न्युक्लिअर रिअॅक्टर मुंबईत आहे. तिथे कधी भाभा सेंटर दूर लोटा असे कुणी बोललेले आठवत नाही. पण कोकणात येऊ द्यायचा नाही. नंतर नाणारला विरोध केला अशा शब्दात राज ठाकरे यांनी टीका केली.