मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) नावाच्या रसायनाने सध्या राज्याचे राजकारण ढवळून काढलं आहे. औरंगाबादेतल्या सभेतून त्यांनी पुन्हा भोंग्याबाबत (Msjid Loudspeaker) इशारा देत सरकारचं टेन्शन वाढवलं. त्यानंतर मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी पोलिसांनी धरपकड सुरू केली. हजारो मनसैनिकांना नोटीसा बजावल्या. मात्र तरीही राज ठाकरे यांनी जराही नमतापणा किंवा चर्चेचा मार्ग स्वीकारला नाही. कारण आज राज ठाकरेंनी भलं मोठं तीन पानांचं पत्र काढत मनसैनिकांसाठी आदेश काढला आहे. त्यांनी कालच भोंग्याबाबत पुढे काय करायचं हे मी उद्या ट्विटरद्वारे मांडेन असे सांगितले आणि आज ट्विटरद्वारे पुन्हा मोठं राजकीय वादळ उठवलं, कारण राज ठाकरे हे मशीदीवरील भोंगे हटवण्यावर ठाम राहिले आहे. आणि त्यांनी तसे आदेश मनसैनिकांसाठी काढले आहे. मात्र या पत्रात राज ठाकरेंनी काही मजकूर बोल्ड केला आहे. त्या मजकुराचीही सध्या जोरदार चर्चा आहे. हा जणू पुन्हा दिलेला सज्जड दम वाटतोय.
देशातल्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की, उद्या ४ मे रोजी जिथे जिथे यांचे भोंगे अजान, बांग देतील, तिथे तिथे आपण भोग्यांवर हनुमान चालीसा लावावी. भोग्यांचा त्रास काय होतो, हे त्यांनाही समजू दे.
सामाजिक भान बाळगत ज्या मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्या मशिदींशी संबंधित लोकांच्या स्तुत्य निर्णयाचे मी स्वागत करतो. तसंच, जिथे भोंगे उतरवण्यात आले आहेत, त्या मशिदींच्या परिसरात कोणताही त्रास होणार नाही, याची हिंदू बांधवांनीही काळजी घ्यावी.
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की, कै. हिंदूहदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंग बंद झालेच पाहिजेत” हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात; की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे.
माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भोंगे हटवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बंधनं झुगारुन एकत्र या.
आता नाही, तर कधीच नाही
राज ठाकरेंनी हा भक्त मनसैनिकांना दिलेला संदेश नाही तर अनेकांना दिलेला हा कडकडीत इशारा आहे. हा इशारा देशभरातील राजकारण सध्या हादरवून सोडत आहे. काही दिवसातच राज्यात महापालिकांच्या आणि इतर काही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकात लागत आहे. त्या सगळ्यावर याचा किती परिणाम होते हे येणारा काळच सांगेल.