नागपूरः राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कोणती सुरक्षा द्यायची, याचा निर्णय कमिटी घेईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी दिली. ते नागपुरात बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली कडव्या हिंदुत्वाची भूमिका, मशिदीवरील भोंग्यासंदर्भात दिलेला इशारा यानंतर ते चर्चेत आलेत. त्यांना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन येत आहेत, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली होती. त्यानंतर राज यांना केंद्र सरकार झेड प्लस सुरक्षा देणार असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यांच्या जीवाला धोका असल्यास सुरक्षा देण्यात गैर नाही, असे वक्तव्य केले होते. राज यांच्या सुरक्षेबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, काही घटकांना केंद्राकडून सुरक्षा पुरविली जाते. मात्र, त्यांच्याकडून राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण केले जाते. मात्र, राज ठाकरे यांना मुंबई पोलिसांकडून जास्त सुरक्षा द्यायची की नाही, याचा निर्णय कमिटी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, कुठल्याही वक्तव्यामुळे, कृतीमुळे समाजा-समाजात तेढ
आणि अशांतता निर्माण होत असेल, तर अशी कृती कारवाईला पात्र ठरते. त्यानुसार कारवाई करू. सगळ्या देशात एकप्रकारे असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. महाराष्ट्रातही अशांत वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. परंतु त्याची महाराष्ट्र पोलिसांनी पूर्ण तयारी केलीय. महाराष्ट्रात अशांततेचे वातावरण निर्माण होणार नाही, याची काळजी घेतोय. रमजानच्या महिन्यात दंग्याचे इनपुट नाही. आज राज्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावलीय. उद्या सगळ्यांची बोलू. आयबी, रॉ, काय म्हणतातयत ते पाहू. त्याची माहिती मुख्यमंत्र्यांसमोर ठेवू. योग्य ती पावले उचलू. त्यासाठी कॅबिनेटमध्ये जायची गरज नाही, असा उल्लेखही त्यांनी केला.
दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, अमरावती, अचलपूर या विशिष्ट परिसरात हिंसक घटना घडतात. याचा अर्थ तिथे काही घटक जास्त अॅक्टिव्ह आहेत. त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. डीजी आज मिटिंग घेणार आहेत. त्यांचा रिपोर्ट येईल. त्यावर निर्णय घेऊ. आपल्या देशात वेगवेळ्या प्रश्नावरून वातावरण तापवायचा प्रयत्न सुरूय. खरे तर भाजप आणि केंद्र सरकारने महागाई, बेरोजगारी, सीमा सुरक्षा यावर चर्चा करावी. मात्र, गोष्टींवरचे लक्ष अन्यत्र वळण्यासाठी असे प्रश्न निर्माण केले जातायत. अशांततात निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. काही लोक सहभागी होत आहेत, असा आरोप त्यांनी केला.