नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( MNS ) वर्धापन दिनाची एकीकडे तयारी सुरू असताना दुसरीकडे नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. खरंतर नाशिकची जबाबदारी युवा नेते अमित ठाकरे यांच्याकडे देऊन राज ठाकरे यांनी नाशिक कडे एक प्रकारे पाठच फिरवली आहे. त्यामुळे मागील महिन्यापासून अमित ठाकरे हे दोनदा नाशिक दौऱ्यावर आले आहे. नाशिकमधील आगामी निवडणुकीची जबाबदारी राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी अमित ठाकरे यांच्याकडे दिल्याची सुत्रांची माहिती आहे. याच दरम्यान नाशिकमधील पदाधिकाऱ्यांच्या नव्याने निवडी होणार असल्याची चर्चा सुरू झाली असून राज ठाकरे यांच्याकडे याबाबत अहवालही दिल्याची माहीती आहे.
नाशिक मधील काही माजी नगरसेवक उद्या होणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर पक्षात प्रवेश करणार आहे. खरंतर पक्षात फेरबदल होण्यापूर्वीच निवडणुकीच्या तोंडावर हे प्रवेश झाल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
नाशिक मधील नव्या पदाधिकाऱ्यांची नावे देखील निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे विद्यमान पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला जातो का ? कामाची पावती म्हणून मोठे गिफ्ट दिले जाणार याबाबत मनसेच्या वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे यांचा दौरा झालेला नाही. राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आलेले असतांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या कामाच्या संदर्भात नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासूनच पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये फेरबदलाची चर्चा होऊ लागली आहे.
नाशिकमधील मनसेच फार काही नवीन चेहऱ्यांचा प्रवेश झालेला नाही. आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात पहिल्यांदाच मोठे प्रवेश होणार आहे. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कमी प्रमाणात दिसून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर युवा नेते अमित ठाकरे स्वतः मैदानात उतरले आहे. विभागानुसार आढावा घेऊन तळागाळातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहे. नाशिकमधील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेत असून त्याबाबतचा अहवालही अमित ठाकरे यांनी तयार करून राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
एकूणच नाशिकला संपर्कप्रमुख पदी नियुक्ती पासून ते जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांच्यासह विद्यार्थी सेनेच्या नियुक्त्या लवकरच होणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज ठाकरे नव्या नियुक्तीनंतरच नाशिकमध्ये येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र, त्यापूर्वी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचं भाषण ही महत्वाचे असणार आहे. यामध्ये राज ठाकरे पक्षाची आगामी काळातील वाटचाल याबरोबरच पक्षाची ध्येय धोरणे यावर बोलणार असल्याने त्यातून पदाधिकाऱ्यांचे कान टोचण्याची शक्यता आहे.
त्यानंतर कदाचित पुढील आठवड्यात लगेचच नाशिक मधील नियुक्त्या जाहीर केल्या जातील अशी शक्यता आहे. त्यामुळे नाशिकमधून कुणाला डच्चू मिळणार आणि कुणाला गिफ्ट मिळणार याकडे संपूर्ण मनसे वर्तुळात चर्चा सुरू असून पदाधिकाऱ्यांची धाकधुक वाढली आहे.