मुंबई : कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मागील कित्येक महिने दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. 26 जूनला शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला सात महिने पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना विरोध दर्शवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी येत्या पावसाळी अधिवेशनात कृषी कायद्यांना विरोध दर्शवणारा एक ठराव करावा अशी मागणी केली आहे. याच मागणीला घेऊन त्यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुंबईत भेट घेतली. त्यानंतर ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (Raju Shetti demands special resolution to be passed to show oppose central agricultural laws in coming monsoon session)
“केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. महाराष्ट्रामध्येही हा असंतोष आहे. पण महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची बाजू घेतल्याने हा विरोध तितका तीव्रपणे दिसत नाही. 26 जूनला शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 7 महिने पूर्ण झाले आहेत. तरी सरकार गांभीर्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघत नाहीये. येत्या 5 जुलैला राज्य विधिमंडळ अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात कृषी कायद्यांबाबत एक ठराव करावा. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विधिमंडळचा पाठिंबा आहे, असा एकमुखी ठराव विधिमंडळाने संमत करावा. संपूर्ण राज्य शेतकऱ्यांच्या बाजूने उभे आहे, हे दाखवून द्यावे,” अशी मागणी शरद पवार तसेच उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
दरम्यान, राजू शेट्टी यांनी शरद पवार यांची आज भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवर शरद पवार यांच्याशी चर्चा केली. तसेच यापूर्वी कृषी कायद्यांसदर्भात बोलण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ मागत आहोत. पण दुर्दैवाने ते वेळ देत नाहीयेत, अशी तोंडी तक्रारही त्यांनी माध्यमांशी बोलताना केली होती. मात्र, त्यानंतर आता पुन्हा संध्याकाळी मुख्यमंत्र्याची भेट झाली असेही त्यांनी सांगितले.
इतर बातम्या :
पुण्यात भाजपची एकहाती सत्ता, पण कारभारी अजित पवार? राजकीय चर्चांना उधाण
शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘वर्षा’वर तासभर खलबतं, कोणत्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा?
कोरोनामुळे पालक गमावलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
(Raju Shetti demands special resolution to be passed to show oppose central agricultural laws in coming monsoon session)