मुंबई : आज अखेर ईदचा (Ramadan Eid 2022) चंद्र (Moon) दिसला आहे. त्यामुळे उद्या देशभरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. यंदा कोरोनाचा (Corona Update) कहर कमी झाल्यामुळे दोन वर्षांनंतर मोकळेपणाने ईद साजरी होत आहे. दोन वर्षांच्या कोरोनाने लावलेल्या ब्रेकरनंतर आता बाजरपेठा पुन्हा फुलू लागल्या आहेत. ईदच्या आधी खरेदीदारांची मोठी गर्दी झाली असल्याचेही दिसून येत आहे. आजूबाजूच्या बाजारपेठेतील दुकाने आणि स्टॉलवर स्थानिक लोक तसेच शहराच्या इतर भागातील लोकांनी खाण्याचे साहित्य, कपडे आणि पादत्राणे खरेदी केली गेली आहे, तर अजूनही काही जणांची खरेदी सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोणताही सण कोरोनामुळे नीट साजरा करता आला नव्हता, प्रत्येक सणावर मर्यादा आल्या होत्या. यंदा मात्र थोडा दिलासा मिळाला आहे.
ईद-अल-फितर किंवा ईद-उल-फितर ही जगभरातील मुस्लिमांनी पाळली जाणारी एक प्रमुख धार्मिक प्रथा आहे. रमजान, इस्लामिक उपवासाचा पवित्र महिना संपतो. हा उत्सव रमजान महिन्यात मुस्लिम पाळत असलेल्या पहाटे ते संध्याकाळपर्यंतच्या उपवासाच्या 30 दिवसांच्या समाप्तीची आठवण करून देतो. याचा दिवस चंद्राच्या दर्शनावरून ठरत असल्याने, जगभरात पाळल्या जाणार्या अचूक तारखेमध्ये थोडाफार फरक असू शकतो.
जगभरातील मुस्लिम लोक ईद-उल-फित्र साजरा करतात, जो सर्वात महत्वाचा सण आहे. हा रमजानच्या शेवटी साजरा केला जातो, ज्यामध्ये धर्मादाय कामे केली जातात, जसे की गरिबांना अन्न देणे आणि भिक्षा वाटणे. ईद-उल-फित्र साजरी करून, उपवास आणि प्रार्थना कालावधी संपतो. चंद्र पाहिल्यानंतर लोक नवीन कपडे घालतात आणि आपल्या प्रियजनांना भेटतात. भारत सहसा सौदी अरेबियाला फॉलो करतो, आपल्याकडे सौदी अरेबियाच्या एक दिवसानंतर चंद्र दिसतो. त्यामुळे आज रात्री आकाशात चंद्र दिसण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ईद साजरी करण्यास सुरूलात होईल आणि उद्याही सुरू राहील.
गेल्या दोन वर्षात जगाने कोरनाच्या तीन लाटा पाहिल्या आहेत. या तीन लाटा कधीही न विसण्यासारख्या आहेत. यात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. तर अनेकांनी आपले उद्योगधंदे देशोधडीला लागताना पाहिले आहेत. आता पुन्हा थोडी मोकळीक मिळू लागल्याने छोट्या व्यापाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पुन्हा उद्योगधंदे पूर्वपदावर येऊ लागले आहेत. त्यामुळे पुन्हा ईद दणक्यात साजरी होणार आहे.