उत्तर प्रदेशात भाजप सोडून गेले त्यांचेच नुकसान होईल. भाजपला काही फरक पडणार नाही. भाजप 300 जागा जिंकणार. विरोधकांसह अखिलेश यादव (Up Elections 2022) यांनी किती प्रचार केला तरी भाजपला हरवणे येऱ्या गबाळ्याचे काम नाही असा टोला केंदीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी समाजवादी नेते अखिलेश यादव यांना लगावला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे कल्याणनजीक गोवेली येथील जीवनदीप कॉलेजमध्ये प्राचार्य धनाजी गुरव यांच्या शोकसभेसाठी आले होते. या कार्यक्रमात भाजप आमदार किसन कथोरे, कॉलेज संचालक रविंद्र घोडविंदे आणि रिपाईचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी अखिलेश यादव यांना टोला लागावला. तसेच अन्य राजकीय मुद्यावर मत मांडले.
राष्ट्रवादी पक्ष हा राष्ट्रीय नाही, भाजपच्या या मताशी मी सहमत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देशात मान्यता नाही. ही पार्टी महाराष्ट्रापुरती आहे. देशातील काही राज्यात पवार साहेबांचे संघटन आहे. मोठ्या प्रमाणात हे संघटन नाही. राष्ट्रवादी नाव आहे. तो राष्ट्रीय पक्ष होत नाही, अशी टीका करत, या भाजपच्या मताशी मी सहमत आहे असेही आठवले यांनी सांगितले.
मराठी पाट्या असव्या, इतर पाट्याला विरोध नको
दुकानांवर मराठी भाषेतील नावाच्या पाट्या असाव्यात, मात्र त्यासाठी राष्ट्र भाषा हिंदी तसेच इंग्रजी भाषेतील नावाच्या पाट्यांना विरोध करणे योग्य नाही.तसेच मराठी पाट्यांचा आकार आणि इंग्रजी भाषेतील पाट्यांचा आकार यावरून भाषिक भेदभाव करण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेला आमचा विरोध आहे.असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज व्यक्त केले.
याआधी राज ठाकरे यांनी दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात याचा आग्रह धरला. आता मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सर्वात आधी भूमीका घेत मराठी पाट्यांचा विषय आणला असून त्यासाठी राज्य सरकार ने तसा कायदा केला आहे. मात्र दुकानांवरील पाट्यांचा आकार लहान मोठा ठरविल्यामुळे मराठी भाषेला मोठेपणा मिळेल असा विषय नसून मराठी भाषा ही मुळातच मोठी आणि श्रेष्ठ आहे. आम्हाला ही आमच्या मराठी भाषेचा अभिमान आहे. मात्र मुंबईत येणारे परप्रांतीय नागरिक परदेशी पर्यटक यांना मराठी सोबत इंग्रजी पाटी सोयीची ठरते.
आठवलेंचा शिवसेनेलाही टोला
मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी मराठी माणसांच्या आर्थिक आणि सर्वांगीण प्रगती साठी राज्य शासनाने विधायक कामे करावीत. दुकानांवरील पाट्या मराठी असण्यासाठी आणि त्या पाट्यांवरील मराठी अक्षरे मोठी असण्यासाठी शिवसेना आणि राज्य शासनातील महाविकास आघाडी जो आटापिटा करीत आहे त्यापेक्षा मराठी माणसांची त्यांच्या मालकीची दुकाने मुंबईत कशी वाढतील, मराठी माणूस कसा व्यापार उद्योगात मोठा होईल याकडे अधिक लक्ष द्यावे असा टोला रामदास आठवले यांनी शिवसेनेला लगावला आहे.