रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगरपालिकेत शिवसेना विरुद्ध मनसे संघर्ष उभा राहिला आहे. महाराष्ट्रातील मनसेचा एकमेव नगराध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांच्याविरोधात अपात्रतेसंदर्भातील प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. खेड हे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे होम पिच आहे. (Ramdas Kadam Scam accusation MNS Leader Vaibhav Khedekar Ratnagiri)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याविरोधात अपात्रतेचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शिवसेनेचे नगरसेवक आणि गटनेत्यांनी हा प्रस्ताव दाखल केला. नगराध्यक्ष पदाचा गैरवापर करत खेडेकरांनी 11 कामांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. खेडेकरांच्या भ्रष्टाचारांची कुंडली पुराव्यासकट जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केल्याचंही रामदास कदमांनी सांगितलं.
खासगी वाहनात डिझेल भरत खेडेकरांनी 77 लाखांचा घोटाळा केल्याचा आरोप रामदास कदम यांनी केलाय. शहराच्या विविध विकास कामांच्या अंतिम बिलांवर नगराध्यक्षांनी एकट्याच्या सहीने पैसे दिल्याचं सुद्धा रामदास कदम यांच्याकडून सांगण्यात आलंय.
महाराष्ट्रातील मनसेच्या एकमेव नगराध्यक्षाला शिवसेना नगरसेवकांनी दणका दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. रामदास कदम नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे खेडमध्ये सेना विरुद्ध मनसे संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत.
“माझं काम कायद्याला धरुन आहे. अपात्रतेच्या ठरावा संदर्भात अद्याप मला काही माहिती नाही” असा दावा नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केलाय. बाहेरगावी असल्याचे सांगत वैभव खेडेकर यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. पण अपात्रतेच्या प्रस्तावामुळे खेडमध्ये सेना विरुद्ध मनसे असा संघर्ष पेटणार एवढं मात्र नक्की.
संबंधित बातम्या :
कोकणात दोन खासदारांचा राडा, मंत्र्यांची मध्यस्थी, राणे-राऊतांच्या भांडणानंतर कार्यकर्तेही भिडले
मी पुन्हा येईन म्हणाले, पण न आल्यामुळे ‘ते’ फ्रस्ट्रेट : रामदास कदम
(Ramdas Kadam Scam accusation MNS Leader Vaibhav Khedekar Ratnagiri)